जिल्हा परिषदेच्या विभागांचा आढावा
गोंदिया,दि.24 : ग्रामीण भागातील लाभार्थी व विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेची भूमिका महत्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना लाभ मिळावा व विकास कामे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासावी. जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीला प्राधान्य देण्यात येणार असून लवकरच मंत्रालय स्तरावर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा काल 23 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉल येथे घेताना पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री.बडोले यावेळी म्हणाले, ग्रामीण भागातील ज्या भागात पाणीटंचाईची स्थिती आहे अशा गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन करावे व त्यानुसार वेळेत पाणीटंचाईवर मात करावी. जिल्ह्यातील ज्या दलित वस्त्यामध्ये पथदिवे, रस्ते, समाज मंदिरे नाही ती कामे प्राधान्याने घेतांना बृहत आराखडा तयार करावा. दलित वस्त्यांमध्ये मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी अभ्यासिका सुरु कराव्यात. बार्टीमार्फत अभ्यासिकेसाठी पुस्तके पुरविण्यात येईल असे ते म्हणाले. दलित वस्तींच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण योजना कुणाला सूचविता येत असेल तर त्या सांगाव्यात असे सांगून श्री.बडोले म्हणाले, ही कामे करतांना ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात येईल. कृषि विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी नाविण्यपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. 2022 पर्यंत सर्वांना घरे दयावयाचे असल्यामुळे शासनाकडून घरकुलाचे उद्दिष्ट वाढवून घेतले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी श्री.ठाकरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने समन्वय साधून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी योग्य समन्वय राखला पाहिजे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावोगावी शौचालयाचा वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याने ग्रामस्थ आता मोठ्या प्रमाणात शौचालयाचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेचे सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती यांनी विविध समस्या मांडल्या.उपस्थित विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची व तिथल्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली.
आढावा सभेला पं.स.सभापती सर्वश्री अरविंद शिवणकर (अर्जुनी/मोर), कविता रंगारी (सडक/अर्जुनी), माधुरी रहांगडाले (गोंदिया), दिलीप चौधरी (गोरेगाव), हिरालाल फाफनवाडे (सालेकसा) यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंडे, जि.प.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्वश्री वाळके, श्री.पारखे, श्री.राठोड, श्री.बागडे, श्री.भांडारकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.विश्वकर्मा, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.चंद्रिकापुरे यांच्यासह सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment