गडचिरोली, दि.२३: आदिवासीबहूल जिल्हा अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे आगामी वर्षाच्या नियोजन आराखडयात आदिवासी देव-देवतांच्या काही मंदिरांची निवड करुन त्यांना पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यानी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या लघु गटांच्या बैठकीत वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या प्रारुप आराखडयाला मान्यता प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. लघु गटाचे प्रमुख आमदार क्रिष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चालू आराखडयात आजवर झालेल्या खर्चाचा आढावादेखील घेण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शान्तनू गोयल, गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी व जिल्हा नियोजन अधिकारी टी. एस. तिडके आदींसह जिल्हयातील सर्व कार्यालयांचे प्रमुख हजर होते.
सन २०१८-१९ चा एकूण आराखडा ४०९ कोटी ४२ लाख ६८ हजार रुपयांचा आहे. यात सर्वसाधारण गटासाठी १३७ कोटी ८५ लाख नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. जिल्हयाचा आदिवासी गटासाठीचा आराखडा मोठा आहे. यात आदिवासी क्षेत्र आराखडा २३५ कोटी ९५ लाख ४५ हजार, तर क्षेत्रबाह्य आराखडा ३ कोटी ८६ लाख इतका आहे. विशेष घटक योजनेंतर्गत प्रस्तावित आराखडा ३३ कोटी १९ लाख रुपयांचा आहे. या प्रस्तावित आराखडयास राज्यस्तरावर मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे. चालू वित्तीय वर्षात असणाऱ्या नियतव्ययात शासनाने ३० टक्के कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
No comments:
Post a Comment