Friday 24 November 2017

कोटगूलनजिक भूसुरुंगस्फोटात 1जवान शहीद, दोन जखमी

कोरची,दि.२४: नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पेरलेल्या भूसुरुंगस्फोटात एक जवान शहीद, तर दोन जवान जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोटगूल येथील आठवडी बाजाराजवळ घडली. 
सुरेश गावडे, असे शहीद जवानाचे नाव असून, सोनल खेवले व विकास धात्रक हे जवान जखमी झाले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष अभियान पथकाचे जवान आज कोटगूल पोलिस मदत केंद्रांतर्गत शेजारच्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी जात होते. कोटगूल-सोनपूर रस्त्यावर आश्रमशाळेनजीक भरणाऱ्या आठवडी बाजारानंतर थोड्या अंतरावर जाताच नक्षल्यांनी कलवर्टवर भूसुरुंगस्फोट घडवून आणला. यात सोनल खेवले, सुरेश गावडे व विकास धात्रक हे तीन जवान जखमी झाले. सोनल खेवले व सुरेश गावडे यांना गंभीर दुखापत झाली. कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने नागपूरला ऑरेंज सिटी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सुरेश गावडे यांचा मृत्यू झाला.
या आठवड्यात नक्षली कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत नक्षल्यांनी तीन नागरिकांची हत्या केली, तर आज भूसुरुंगस्फोट घडवून आणला. यामुळे 'नक्षली बॅकफूटवर आले' असा दावा करणाऱ्या पोलिस प्रशासनापुढे नक्षल्यांचा बीमोड करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...