पुणे,दि.२८ः:छगन भुजबळ हे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत पण ते लढवय्ये नेते आहेत. ते जेलमधून बाहेर आले पाहिजेत. मात्र, कायदेशीर लढाई करून ते लवकरच बाहेर येणार आहेत. भुजबळांना लवकरात लवकर जामीन मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना, असे वक्तव्य भाजपचे मंत्री दिलीप कांबळे यांनी केले. दरम्यान, समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांच्या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीच भुजबळांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करून त्यांना जेलमध्ये घातले त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याने केलेले हे विधान धक्कादायक मानले जात आहे.
समाजसुधारक व विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पुण्यातील फुले वाड्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दिलीप कांबले बोलत होते. यावेळी केंद्रातील मंत्री व माळी समाजाचे नेते उपेंद्रसिंह कुशवाह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आदी उपस्थित होते. त्यांच्या समक्षच कांबळे यांनी हे वक्तव्य केले.
कांबळे म्हणाले, भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ज्या कलमाच्या आधारे भुजबळसाहेबांना जामीन मिळत नव्हता ते कलमच आता रद्द झाले आहे. त्यामुळे भुजबळ लवकरच बाहेर येतील. ते बाहेर आले पाहिजेत. कायद्याच्या कचाट्यात ते अडकले पण हार मानणा-यातील नाहीत. त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना, असे आशयाचे वक्तव्य दिलीप कांबळे यांनी केले.अखिल भारतीय समता परिषदेकडून दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ विचारवंत मा. गो. माळी यांना देण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी पवार म्हणाले, दिल्लीमध्ये देशभरातील ओबीसी संघटनाचे एकत्रीकरण करून पंतप्रधान यांच्यासमोर ओबीसींचे प्रश्न मांडू, तसेच कायम स्वरूपी फोरम स्थापन करून व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, असेही पवार यांनी सांगितले.यावेळी मूळचे बिहार राज्यातील असलेले केंद्र सरकारमधील नेते उपेंद्रसिंह कुशवाह म्हणाले, आज भुजबळ पवारांच्या शेजारी बसलेले हवे होते. मात्र, सर्व परिस्थितीवर मात करत लवकरच ते आपल्यासोबत विविध कार्यक्रमात दिसतील असे वक्तव्य कुशवाह यांनी केले.
No comments:
Post a Comment