अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.20ः- जलयुक्त शिवार अभियान २0१५-१६ अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुक्यातील सुकळी खैरी गटग्रामपंचायतीअंतर्गत येणार्या बोळदे गावाला पुण्यलोकअहिल्याबाई होळकर जलमित्रचा जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार म्हणून वीस हजार रोख व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
जलयुक्त शिवार योजनअंतर्गत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बोळदे येथे जलसंवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात आले. यात, भात खाचर, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, बोडी नुतनीकरण आदी उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी ग्रामसेवक परमेश्वर नेवारे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पंचशीला मेर्शाम व ग्रामपंचायत कमिटीने सहकार्य केले.
त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच बोळदे गावाला जलमित्रचा जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला. नवनिर्वाचित सरपंच लालसिंह चंदेल यांनी वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार स्विकारला. दरम्यान अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या वतीने सरपंच लालसिंह चंदेल व ग्रामसेवक परमेश्वर नेवारे यांचा शाल, श्रीफळ देवून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांच्या सत्कार समारोहाला यावेळी जि.प.उपाध्यक्षा रचनाताई गहाणे, सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, सहायक बीडीओ मयूर अंदेलवाड, अनुपकुमार भावे, राजु वलथरे, उपसरपंच कांचन उके, सदस्य पंचशीला मेर्शाम, नंदा घरतकर, चित्ररेखा मेर्शाम, कीर्ती भोयर, ज्ञानदेव प्रधान, धम्मदिप मेराम, शामलाल बोरघरे प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment