गोंदिया,दि.०२- गोंदिया जिल्हा पोलिस अंतर्गत येत असलेल्या दवनीवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वामनराव हेमने यांना २ हजाराची लाच घेताना आज लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली.
तक्रारदार हे बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे काम करीत असून त्याच्याकडे दोन टिप्पर आहेत. १ डिसेंबरला तक्रारदाराच्या टिप्परने बोल्डरची वाहतुक करीत असताना सालईटोला येथील बसस्टाप समोर सहाय्यक पोलिस निरीक्षक वामनराव हेमने यांनी टिप्पर पकडले.त्यावेळी टिप्पर चालकाने टिप्परमालकाशी हेमने यांचे मोबाईलवर बोलणे करुन दिले असता टिप्परवर कारवाई न करण्याकरिता तसेच मासिक हप्ता म्हणून २ हजाराची लाच मागितली. तक्रारदारास ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने गैरअर्जदार हेमने यांच्याविरुध्द १ डिसेंबरलाच लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारावर आज २ डिसेंबरला विभागाच्या वतीने सापळा रचून कारवाई करण्यात आली असता सहाय्यक पोलिस निरिक्षक वामन हरीभाऊ हेमने,पोलीस स्टेशन दवनीवाडा यांना लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट व गैरमार्गाचा अवलंब करीत तक्रारदारास मागितलेली लाच पंचासमक्ष घेताना रंगेहाथ पकडले असून दवनीवाडा पोलिस स्टेशनला कलम ७,१३(१)(ड)सहकलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,पोलिस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे,पोलिस निरीक्षक प्रमोद चौधरी,फौजदार दिवाकर भदाडे,राजेश शेंद्रे,रंजित बिसेन,डिगंबर जाधव,नितिन रहागंडाले,वंदना बिसेन ,देवनानंद मारबते यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment