Monday, 6 April 2020

दिवा लावण्याचा नादात जिवती तालुक्यात घरच जळाले



चंद्रपूर,दि.06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला एकीकडे जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला असतानाच मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली. 
पाटण येथील कुंदन उईके व पल्लेझरी श्रीहरी वाघमारे यांना दिवे लावणे महागात पडले.जिवती तालुक्यातील पाटण येथील कुंदन देवराव उईके यांनी रविवारी रात्री ९ वाजता पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपल्या घरामध्ये लाईट बंद करून दिवे लावले. त्यानंतर उईके यांचे कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक दिव्यामुळे घराला आग लागली. काही वेळात ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोकांनी पाणी टाकून आगीला आटोक्यात आणले. मात्र तोपर्यंत घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. रोख रक्कम १५ हजार रुपये, एक ते दीड क्विंटल तुरी, स्वस्त धान्य दुकानातून आणलेले ५० किलो धान्य, ज्वारी, वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा, जातीचे दाखले, मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी वस्तू आगीत जळाल्याची माहिती कुंदन देवराव उईके, विमल कुंदन उईके यांनी दिली. पाटण येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी व बिट अमलदार साहेबराव कालापाहड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.पल्लेझरीतील घरालाही आगजिवती तालुक्यातीलच पल्लेझरी येथील श्रीहरी वाघमारे यांच्या घरालाही रविवारी लावलेल्या दिव्यामुळे आग लागली. श्रीहरी वाघमारे यांनी रविवारी रात्री कोरोनाशी लढा देण्यासाठी आम्ही सारे एक आहोत, हा संदेश देण्यासाठी रात्री ९ वाजता घरी दिवे लावले. मात्र याच दिव्यामुळे त्यांच्या घराला आग लागली. गावकऱ्यांनी पाण्याने ही आग विझविली. मात्र आगीत वाघमारे यांचे मोठे नुकसान झाले.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ६३८ वर 32 मृत्यू


 

मुंबई,दि.05. राज्यात शनिवारी २४ तासांत एकूण १४५ नव्या रुग्णांची नोंद असून आज सकाळी बुलडाण्यात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण रुग्णांची संख्या ६३८ वर पोहोचली आहे. यापैकी ९९ रुग्णांची नोंद ही मुंबईत झाली आहे. पुण्यात १२, ठाणे जिल्हा व अन्य मनपामध्ये २२, नागपूर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती प्रत्येकी १, लातूर ८, उस्मानाबादेत २ रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ६ जणांचा मृत्यू नाेंद झाला. यापैकी ४ जण मुंबईतील, १ मुंब्रा ठाणे व १ अमरावतीचा आहे. मृत्यूंचा आकडा आता ३२ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. मरकजमधील रुग्णांचा आकडा ७ वर स्थिर आहे. यात निलंग्यातील रुग्णांचा समावेश नाही. यातच आता पुण्यातील मृतांचा आकडा 5 वर गेला आहे. पुण्यातील एका स्लम भागात वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचही मृत्यू झालेल्या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. स्थानिक संसर्गातून या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Saturday, 4 April 2020

जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


अफवा पसरविणाऱ्यांना इशारा
Coronavirus: I will save the public from corona but will not leave you; Chief Minister Uddhav Thackeray's warning pnm | Coronavirus:...तर खबरदार, जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा


मुंबई,दि.04 – कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक हॉटेल्सने युद्धात लढणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची सोय करतात. अनेक जण या कार्यात मदत करतायेत. त्या सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या आवाहनात हात जोडतो, विनंती करतो हे शब्द वापरतो. पण कोविड १९ सारखा आणखी एक व्हायरस समोर येत आहे. जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, नोटांना थुकी लावून व्हिडीओ पसरवले जात आहेत. जर कोणी जाणूनबुजून अफवांचे व्हायरस पसरवत असाल तर खबरदार, तुम्हाला सोडणार नाही. जनतेला मी कोविड पासून वाचवेन पण तुम्हाला कायद्यापासून कोण वाचवणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मंगळवारपासून लॉकडाऊन सुरु होणार आहे . देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो शत्रू एकच आहे. नाईलाजास्तव घरात राहावंच लागणार आहे. पंतप्रधानांशी चर्चा होत असते. सोनिया गांधी, शरद पवारांशी चर्चा झाली, अनेक धर्मगुरु, मौलवी यांच्याशी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने आवाहन करत आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार आहे. पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी असं त्यांनी सांगितले.तसेच कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. ५१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत. दुर्दैवाने काही मृत्यू झालेत यात वृद्ध, आजारी व्यक्ती यांचा समावेश आहे. आपल्या घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. त्यांच्यापासून अंतर राखणे, घराबाहेर जाऊ नये, हात स्वच्छ करुन त्यांची सेवा करा. सर्व देशात हीच काळजी घेतली जात आहे. दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. राज्यात परवानगी मागण्यात आली पण कोरोनामुळे ही परवानगी नाकारली. जे दिल्लीतून राज्यात आले त्यांची यादी मिळाली यातील १०० टक्के लोकांचा शोध घेतला आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे. येत्या काही दिवसात पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय,क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.त्याचसोबत राज्यात ५ लाखाच्या आसपास परराज्यातील मजूर वास्तव्यात आहे. त्यांना दोन वेळचं जेवण, डॉक्टर्स वैगेरे सुविधा दिल्या आहेत. कोणालाही कुठे जायची गरज नाही. आमच्या राज्यातील लोकांचीही इतर राज्यात काळजी घ्यावी. इतर राज्यात कोणीही माणूस अडकला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांची मदत करण्याबाबत त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.दरम्यान, अतिरेक्यांचे लक्ष मुंबईत असते तर व्हायरसचं लक्षही मुंबई आहे. मुंबईकर शौर्याने या संकटाला सामोरे जात आहे. मुंबईने अनेक धक्के पचवले आहेत. त्यामुळे मुंबईला काही होणार नाही. लोकांनी काळजी घ्या. कोविड १९ ची लक्षण आढळत असतील तर जे हॉस्पिटल दिलेत तिथेच चाचणी करण्यास जा. सर्दी, खोकला या सर्वापासून खबरदारी घ्या.  अत्यावश्यक कामासाठी जर बाहेर जात असाल तर मास्क लावलं पाहिजे असं सिंगापूरमध्ये सांगितलं तसं आपल्याकडेही करायला हरकत नाही. मास्क पाहिजे असं नाही घरातील स्वच्छ कापड तोंडाला बांधून बाहेर जा. मार्केटमध्ये गर्दी करु नका, २४ तास दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. गर्दीतसुद्धा अंतर ठेऊन राहा अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५३७ वर



मुंबई,दि.0४: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४७ ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ५३७  वर पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यातले आहेत. यापैकी २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. कालरात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.
आज मुंबईत 28, ठाणे 15, अमरावती 1, पुणे 2, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 अशा एकूण 47 नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास  मुंबईत सर्वाधिक 306, पुण्यात 73, ठाणे आणि एमएमआर परिसरात 70, सांगली 25, अहमदनगर 20, नागपूर 16, बुलढाणा 5, यवतमाळ 4,सातारा आणि औरंगाबाद प्रत्येकी 3, कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रत्येक 2 आणि सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी एका कोरोनाबधिताची नोंद झाली आहे.  राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. अशातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. धारावीत कोरोनाचं संक्रमण वाढलं तर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यानंतर हे रोखणं सरकारसमोर आव्हान असणार आहे. त्याचसोबत मुंबईत सीआयएसएफच्या ६ जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

तात्पुरत्या निवाऱ्यातील महिलेने दिला बाळास जन्म


देवरीतील आरोग्य चमू धावली मदतीला

सुरेश भदाडे

देवरी,दि.०४- कोरोना संसर्गाच्या भीतीने देशात सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती. सर्वकाही थांबलेले. प्रत्येकजण आहे तेथेच थांबलेला. अशातच देवरीतील एका खासगी पब्लिक स्कूलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पोटासाठी भटकंती करणाऱ्या एका गटासाठी प्रशासनाने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. या निवाऱ्यातील लोकांच्या आरोग्याची खबरदारी आरोग्यविभागावर सोपविण्यात आली. काल त्यातील एका महिलेला अचानक प्रसूती कळांचा त्रास जाणवायला लागल्या. अन तिच्या मदतीला आरोग्य विभागाची चमू देवदूतासारखी धावून आली. त्या महिलेने साकोलीच्या एका खासगी रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला.
हातावर पोट असलेला समाज राज्यात भटकंती करून आपले जीवन जगत असतो. असाच एक लोकांचा समूह देवरी तालुक्यात सुद्धा भटकंतीवर होता. अचानक देशात कोरोना संसर्गाने आणीबाणीची स्थिती उत्पन्न झाली. देशात सर्वत्र एकाचवेळी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. प्रत्येक जण आहे तिथेच अडकला गेला. परिणामी, या भटकंती करणाऱ्या समाजावरही थांबण्याची वेळ आली. यावेळी तालुका प्रशासन त्यांच्या मदतीला धावून आला. त्या सर्वांची देवरीच्या एका स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांच्या चमूने घेतली. या निवाऱ्यात असलेल्या एका गर्भवती महिलेला काल सायंकाळी अचानक प्रसूती कळा यायला सुरवात झाली. डॉ. कुकडे यांनी यांची वेळीच दखल घेतली. डॉक्टर आणि परिचारिकांची चमू तेथे पोचली. प्राथमिक तपासणी करून रुग्णाला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रसूती गुंतागुंतीची असल्याने स्थानिक डॉक्टरांपुढे पेच निर्माण झाला. देवरी येथे प्रसूती शक्य नसल्याने डॉ. कुकडे यांनी त्या महिलेला साकोली तेथील पार्वती नर्सिंग होम येथे नेण्याचा निर्णय घेतला. पार्वती नर्सिंग होमचे डॉ. लंजे यांच्या देखरेखीत त्या महिलेवर शल्यचिकित्सा करण्यात आली. अखेर त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
प्रियंका कैलास इंगोले (वय २३) राहणार पडोळकरवाडी, पोस्ट हुन्नर, तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे आहे. नवजात बाळाचे वजन १९०० ग्रॅम असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याची माहिती देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांनी बेरारटाईम्सशी बोलताना दिली.  डॉ. कुकडे यांनी पुढे सांगितले की, या महिलेसह तिच्या बाळाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्यविभागाने उचललेली असून प्रसूतिपश्चात चार दिवसाने बाळ आणि बाळंतीण हिला एका खास रूममध्ये शिफ्ट करण्यात येणार असून दोघांच्याही आरोग्याची खबरदारी घेण्यात येईल. अडचणीच्या काळात मदतीला देवासारखे धावून येणाऱ्या वैद्यकीय चमूचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


Friday, 3 April 2020

देवरीत शिवभोजन योजनेचा शुभारंभ

देवरी,दि.03 - गरीब आणि गरजू नागरिकांसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवथाळी भोजन योजनेचा आज शुक्रवारी (दि.03) देवरी येथे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे कोरोना संक्रमण काळात लाभार्थ्यांना नाममात्र पाच रुपयात या योजनेचा लाभ घेता येईल.
स्थानिक तहसील कार्यालयासमोरील रेशीम भोजनालयामध्ये शिवथाळी भोजन योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी अगळे, पुरवठा अधिकारी झोडापे, पत्रकार सुनील चोपकर, महेंद्र वैद्य, प्रितम गजभिये, सुरेश भदाडे, सुनील अग्रवाल, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेश पटले, नंदू शर्मा रेशीम भोजनालयाचे संचालक ज्योतिबा धरमशहारे आदी मान्यवर उपस्थित होते. या भोजन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दहा रुपयांत भोजन मिळेल, मात्र, कोरोना संक्रमण काळात या भोजनथाळीची किमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. देवरीमध्ये प्रारंभी 75 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान घेता येईल. लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

Wednesday, 1 April 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाभार्थ्यांना मिळणार त्या – त्या महिन्यातच धान्य


*अतिरिक्त धान्य मोफत मिळणार*
गोंदिया दि.१(जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत एप्रिल ,मे आणि जून 2020 चे धान्य एकत्रितपणे देण्याचे शासनाने घोषित केले होते. शासनाच्या नवीन निर्देशानुसार एप्रिल, मे आणि जून 2020 चे धान्य आता त्या-त्या महिन्यातच लाभार्थ्याला वितरित करण्याचे निश्चित केले आहे.
जिल्ह्यातील सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांचा एप्रिल महिन्याचा धान्यसाठा पॉस मशीनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 35 किलो धान्य यामध्ये 10 किलो गहू आणि 25 किलो तांदूळ असा दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ याप्रमाणे मिळणार आहे.प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू दोन रुपये प्रति किलो दराने आणि तीन किलो तांदूळ तीन रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे फक्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर 20 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कुटुंब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती अतिरिक्त 5 किलो तांदूळ प्रति महिना 31 मार्च 2020 च्या शासन निर्णयानुसार मंजूर केले आहे. हे अतिरिक्त धान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे.त्याचा डेटा अद्याप पास मशीनवर उपलब्ध झालेला नाही. तो डेटा आणि धान्य लवकरच उपलब्ध झाल्यानंतर याच महिन्यात अतिरिक्त पाच किलो तांदळाचे मोफत वाटप करण्यात येईल. त्यानंतरही मे आणि जूनचे मोफत धान्य त्या-त्या महिन्यातच वाटप करण्यात येईल. तोपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल महिन्याचे आपआपले धान्य आपल्या स्वस्त धान्य दुकानातून गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवून घेऊन जावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी केले आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...