Saturday 4 April 2020

तात्पुरत्या निवाऱ्यातील महिलेने दिला बाळास जन्म


देवरीतील आरोग्य चमू धावली मदतीला

सुरेश भदाडे

देवरी,दि.०४- कोरोना संसर्गाच्या भीतीने देशात सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती. सर्वकाही थांबलेले. प्रत्येकजण आहे तेथेच थांबलेला. अशातच देवरीतील एका खासगी पब्लिक स्कूलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पोटासाठी भटकंती करणाऱ्या एका गटासाठी प्रशासनाने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली. या निवाऱ्यातील लोकांच्या आरोग्याची खबरदारी आरोग्यविभागावर सोपविण्यात आली. काल त्यातील एका महिलेला अचानक प्रसूती कळांचा त्रास जाणवायला लागल्या. अन तिच्या मदतीला आरोग्य विभागाची चमू देवदूतासारखी धावून आली. त्या महिलेने साकोलीच्या एका खासगी रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला.
हातावर पोट असलेला समाज राज्यात भटकंती करून आपले जीवन जगत असतो. असाच एक लोकांचा समूह देवरी तालुक्यात सुद्धा भटकंतीवर होता. अचानक देशात कोरोना संसर्गाने आणीबाणीची स्थिती उत्पन्न झाली. देशात सर्वत्र एकाचवेळी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. प्रत्येक जण आहे तिथेच अडकला गेला. परिणामी, या भटकंती करणाऱ्या समाजावरही थांबण्याची वेळ आली. यावेळी तालुका प्रशासन त्यांच्या मदतीला धावून आला. त्या सर्वांची देवरीच्या एका स्थानिक पब्लिक स्कूलमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांच्या चमूने घेतली. या निवाऱ्यात असलेल्या एका गर्भवती महिलेला काल सायंकाळी अचानक प्रसूती कळा यायला सुरवात झाली. डॉ. कुकडे यांनी यांची वेळीच दखल घेतली. डॉक्टर आणि परिचारिकांची चमू तेथे पोचली. प्राथमिक तपासणी करून रुग्णाला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रसूती गुंतागुंतीची असल्याने स्थानिक डॉक्टरांपुढे पेच निर्माण झाला. देवरी येथे प्रसूती शक्य नसल्याने डॉ. कुकडे यांनी त्या महिलेला साकोली तेथील पार्वती नर्सिंग होम येथे नेण्याचा निर्णय घेतला. पार्वती नर्सिंग होमचे डॉ. लंजे यांच्या देखरेखीत त्या महिलेवर शल्यचिकित्सा करण्यात आली. अखेर त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
प्रियंका कैलास इंगोले (वय २३) राहणार पडोळकरवाडी, पोस्ट हुन्नर, तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे आहे. नवजात बाळाचे वजन १९०० ग्रॅम असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याची माहिती देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांनी बेरारटाईम्सशी बोलताना दिली.  डॉ. कुकडे यांनी पुढे सांगितले की, या महिलेसह तिच्या बाळाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्यविभागाने उचललेली असून प्रसूतिपश्चात चार दिवसाने बाळ आणि बाळंतीण हिला एका खास रूममध्ये शिफ्ट करण्यात येणार असून दोघांच्याही आरोग्याची खबरदारी घेण्यात येईल. अडचणीच्या काळात मदतीला देवासारखे धावून येणाऱ्या वैद्यकीय चमूचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...