Monday 20 April 2020

अटी व शर्तीच्या अधीन राहून,जिल्ह्यातील रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू करावे

गोंदिया दि.20ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अमलात आणण्यात येत आहे.जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे.3 मेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे विभागाची कामे अपूर्ण असून प्रगतीपथावर आहे. येणारा पावसाळा व आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता रस्त्याची व रेल्वेची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे.त्यामुळे अत्यावश्यक सेवा ही कोलमडणार नाही.
केंद्र शासनाच्या 15 एप्रिलच्या आणि राज्य शासनाच्या 17 एप्रिलच्या आदेशाने रस्त्यांचे बांधकाम व जलसंधारणाची कामे इत्यादी प्रकल्प सुरू ठेवण्यास अनुमती दिली आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी सुद्धा राष्ट्रीय महामार्गांतर्गत येणारी कामे सुरू करण्याबाबत सूचित केले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशाद्वारे पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून रेल्वे विभागाची व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कामे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत संबंधित कामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांकडून ही कामे करण्यात यावी.बाहेरून कोणतेही नवीन मजूर आणू नये.मजुरांना व त्यांच्या कुटुंबीयांना कामाचे क्षेत्र सोडून जाण्यास पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हयाबाहेरून या कामाकरिता नवीन मजुर आणता येणार नाही. मजुरांना बांधकामाच्या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला,किराणा व इतर आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था संबंधित कंत्राटदाराने करावी.
कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराने हँडवॉश स्टेशन तयार करावे. मजुरांना सॅनिटायझर व मास्क पुरवावे.सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष कामे होत असल्याची खात्री संबंधित कंत्राटदाराने करावी.कामावरील मजुर, त्यांचे कुटुंबीय,पर्यवेक्षीय कर्मचारी व अभियंते यांच्यापैकी कोणालाही कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने महसूल किंवा आरोग्य विभागात कळवावे. स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील.
कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सर्व मजूरांना व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना त्यांच्या मातृभाषेतच स्पष्टपणे सांगाव्यात. मजुरांची नियमित वैद्यकीय तपासणी करावी. कोणत्याही मजुरांची प्रकृती बिघडणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. एक वेगळी नोंदवही यासाठी तयार करून ठेवावी.यामध्ये मजुरांची दैनंदिन आरोग्य स्थिती लिहिलेली असावी. मजुरांसाठी पासेस देण्याबाबत स्वतंत्र आदेश पारित करण्यात येतील.
लॉकडाऊन लागू होतांना नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रातील जे बांधकाम प्रकल्प सुरू होते व ज्या प्रकल्पांमध्ये कामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असून बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकल्पांचे काम सुरू ठेवण्यास 20 एप्रिलपासून परवानगी देण्यात आली आहे.मात्र सदर सवलत/परवानगी ही कन्टेन्टमेंट झोनला लागू असणार नाही.तसेच एखादे नवीन क्षेत्र कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित झाल्यास अशा क्षेत्रातील सवलती रद्द होतील.
परवानगी देतेवेळी वरील सर्व सूचनांचे पालन करणे ही संबंधितांची जबाबदारी राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांनी एका आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...