
डुग्गीपार येथील मुकेश रामकृष्ण कापगते यांच्या घरी २९ सप्टेंबर २0१९ रोजी घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी डुग्गीपार पोलीसात नोंद करण्यात आली होती. तर संशयीत आरोपी म्हणून अशलेश लाडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गावातून फरार होता. दरम्यान अशलेश लाडे हा सालेकसा तालुक्यात असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीवरुन डुग्गीपार पोलीसांनी १९ एप्रिल रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने घरफोडी करुन २ लाख ७५ हजार ८00 रुपयांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या दागिन्यापैकी काही दागिने विकल्याची माहिती दिली. पोलीसांनी अशलेशकडून २ लाख १८ हजार ५00 रुपयांचे दागिने जप्त करुन त्याला अटक केली तसेच अशलेशने दिलेल्या माहितीच्या आधारे २३ एप्रिल रोजी कोहमारा येथील सराफा तेजश येरपुडे याच्या सराफा दुकानावर धाड टाकली असता त्याने चोरीचे ५७ हजार रुपयांचे दागिने विकत घेतल्याचे कबूल केले. पोलीसांनी येरपुडे याला अटक केली असून विकत घेतलेले दागिने जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात डुग्गीपारचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे, पोलीस नायक चंद्रीकापुरे, पोलीस शिपाई चंदनवाटवे, वाटोरे यांनी केली.
No comments:
Post a Comment