
अहेरी तालुक्यातील किष्टापूर नाल्यावरील पुलाच्या नाल्यावरील पुल बांधकामाचा फायदा या भागातील अनेक ग्रामस्थांना दळणवळणासाठी होणार आहे. याची जाणीव ग्रामस्थांना आहे. पावसाळय़ात या नाल्याला पूर आल्यानंतर या भागातील ग्रा.पं. चा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क पूर्णपणे तुटतो. यामुळे शालेय विद्यार्थी, मजूर व वैद्यकीय सेवेची आवश्यक असलेल्या नागरिकांची ये-जा बंद होते. यामुळे उपचाराअभावी मृत्यू होण्याचा धोका देखील संभवतो. यामुळे सदर नाल्यावरील पूल बांधकामाचे महत्व पंचक्रोशीतील नागरिक जाणून आहेत. किष्टापूर नाल्यावरील पूल पंचक्रोशीतील नागरिकांसाठी अतिमहत्त्वाचा असल्यानेच पोलिस दलाने युद्धपातळीवर विशेष प्रयत्न करून या पुलाच्या बांधकामाची परवानगी प्राप्त केली होती. यावेळी या भागातील दोन हजार नागरिकांनी पोलिस दलाचे मिठाई वाटत आभार मानले होते.
नक्षल्यांनी कोणत्याही बाबीचा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी येथील पुलाचे बांधकाम हाणून पाडण्यासाठी वाहनांची जाळपोळ केली, असल्याचे सांगत पंचक्रोशीतील दोडगीर, शेडा, आसली, मुखनपल्ली, बिर्हाडघाट, कोंजेड, येलाराम, कामासूर, मुत्तापूर, तोडका, मिट्टीगुडम, पेठा, जोगनगुडा, कोडसापल्ली, देचलीपेठा, सिंध, किष्टापूर, पेरकाभट्टी, दोडगीर, पत्तीगाव, लखनगुडा, शेडा या २२ गावानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत घेतलेल्या ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव मंजूर केला आहे. ठरावात नक्षलवाद्यांना गावात पाय ठेवू न देणे तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने किष्टापूर नाल्याच्या पुलावरील बांधकाम सुरू ठेवून लवकरात लवकर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना नवसंजीवनी देणारा हा पूल उभारावा, असे ठरावात म्हटले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी प्रशासनाला ग्रामस्थ स्वत: पुढकार घेऊन मदत करीत, अशी ग्वाहीही ठरावात देण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांनी नक्षलवादी स्वत:च्या फायद्यासाठी करून घेत असलेला जनतेचा वापर नक्षल्यांनी तत्काळ थांबवावा व जनतेच्या विकासाच्या आड येवू नये, असा इशारा पंचक्रोशीतील २२ ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी नक्षल्यांना दिला आहे.
ग्रामसभेत नक्षल गावबंदी ठराव संमत करणार्या या १६ ग्रामपंचायतीचे नक्षल गावबंदीचे ठराव जिल्हाधिकारी यांचे कार्यालयास पाठवून महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे या गावांच्या विकासासाठी ६ लाख रूपये प्रोतसाहनात्मक अनुदान म्हणून मंजूर करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. या १६ गावात नक्षल गावबंदी ठराव संमत करणार्या ग्रामस्थांच्या कृतीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, यांनी स्वागत केले असून, नक्षल गावबंदी योजनेंतर्गत या गावांच्या विकासासाठी गडचिरोली पोलिस दल सदैव या ग्रामस्थांच्या पाठीशी राहील तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पोलिस दल प्रयत्न करेल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी ग्रामस्थांना दिले.
No comments:
Post a Comment