Thursday 30 April 2020

मुल्ला येथील जि.प. शाळेतून एलईडी संच लंपास

मुख्यालयात एकही शिक्षक राहत नसल्याने चोरट्याचे फावले

देवरी, दि. 30 - देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला येथील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेतील एलईडी संच चोरीला गेल्याची घटना आज गुरूवारी (दि.30) उघडकीस आली आहे. दरम्यान, कोरोना संक्रमणामुळे असलेल्या टाळेबंदीचा गैरफायदा उचलत शाळेतील सर्व शिक्षकांनी वरिष्ठांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आता कोणती भूमिका घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. उल्लेखनीय म्हणजे शाळेच्या इतिहासातील चोरीची पहिलीच घटना असल्याचे गावकरी सांगत आहेत.
सविस्तर असे की, संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आहे. यामुळे सर्वत्र टाळेबंदी आहे. शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थितीवर नियंत्रण करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी आपले मुख्यालय सोडून आपल्या स्वगावी निघून गेल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागातील तर परिस्थिती याहूनही गंभीर आहे. अनेक कर्मचारी हे आपल्या वरिष्टांची परवानगी न घेता जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. नेमका याच गोष्टीचा फायदा चोरट्यांनी उचलायला सुरवात केल्याची घटना मुल्ला शाळेतील एलईडी संच चोरट्यांनी लंपास केल्यावरून दिसून येते.
मुल्ला शाळेतील युनिवर्सल कंपनीचा 32 इंच टीवी संच 9 ते 30 एप्रिल दरम्यान चोरट्यांनी लंपास केल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या एका सदस्याने प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. ही बाब आज शालेय पोषण आहार वाटप करण्यासाठी बाहेरगावून आलेल्या शिक्षिकेच्या लक्षात आली. यापूर्वी सदर शिक्षिकेने 9  एप्रिल रोजी शालेय पोषण आहाराचे वाटप केल्याचेही सांगण्यात येत आहे. चोरट्याने शाळेचे कुलूप तोडून चोरी केल्याचे समोर आले आहे.  उल्लेखनीय म्हणजे शाळेच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी घडली नसल्याचेही गावकरी सांगत आहेत. शाळेचे कर्मचारी हे मुख्यालयात राहत नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहत असल्याबाबत गावच्या ग्रामसभेचा ठराव आपल्या वरिष्ठ कार्यालयास देणे बंधनकारक आहे. मात्र, या शासनाच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...