Wednesday 1 April 2020

विस्थापित, बेघर व भिकारी आढळल्यास निवारागृहात पाठवा- जिल्हाधिकारी


भंडारा, दि. 01 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे औद्योगिक क्षेत्रातील अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशा कामगारांसह बेघर व भिकारी जिल्ह्यात कुठेही आढळल्यास तात्काळ सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील निवारागृहात त्यांची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात 9 ठिकाणी निवारागृहे (शेल्टर होम) सुरू करण्यात आले आहेत, या निवारागृहात 700 नागरिकांची राहण्याची व्यवस्था आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात ही सोय करण्यात आली आहे. भंडारा 4, लाखनी 2, साकोली, तुमसर, लाखांदूर व पवनी प्रत्येकी एक अशा 9 वसतिगृहात निवारागृह तयार करण्यात आले आहेत.
विस्थापित, कामगार, बेघर व भिकारी व्यक्तीची राहण्याची अथवा जेवणाची सोय नाही व्यकींना निवारागृहात ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्याशी संपर्क साधून गरजूंची तात्काळ व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अन्न मिळेल याकडे जातीने लक्ष पुरवावे असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे जिल्हा पुरवठा कार्यालयाने गरीब व गरजू व्यकींना वितरीत करण्यासाठी 14 क्विंटल तांदूळ उपलब्ध करून दिला आहे. हा तांदूळ तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला अजून गरजूंना तांदुळ वाटपाचे काम प्रत्येक तालुक्यात तहसीलदार यांचे मार्फत सुरू आहे. मागणी वाढल्यास तांदूळ पुरवठा केला जाईल.
लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर झालेले नागरिक, विस्थापित झालेले तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत, त्या नुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष तसेच अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू केली आहेत.
बेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैधकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
विविध ठिकाणाहून येणाऱ्या विस्थापित व बेघर नागरिकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्या कडे आहे. त्या स्वतः जातीने व्यवस्था पाहत आहेत. निवारागृहातील नागरिकांना दोन वेळचे जेवण, चहा, नास्ता, गरजूंना कपडे, सॅनिटायझर, ब्रश, साबण, तेल इत्यादी वस्तू पुरविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवूनच सर्व व्यवहार केले जातात. नागरिकही हा नियम कसोशीने पाळतात. आरोग्य विभागाच्या वतीने आज येतील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...