Friday, 24 November 2017

अट्टल मोबाईल चोरट्यांना अटक; रेल्वे सुरक्षा आयुक्तांची माहिती

गोंदिया,दि.24ः- रेल्वेचा प्रवास सुरक्षीत व भयमुक्त वातावरणात व्हावा, यासाठी रेल्वे सुरक्षा दलातर्फे निरंतर वाढणार्‍या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवून रेल्वे प्रवाशांना पूर्ण सुरक्षा देणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी दिली.

दरम्यान, आयुक्त श्री पांडे यांनी गोंदिया रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणार्‍या तीन आरोपींना अटक केले असून त्यांच्याजवळून २0 महागडे मोबाईल जप्त केल्याची माहिती दिली. शाहरूख, रशीद व विक्की असे आरोपींची नावे असून तिघेही गोंदियाचे रहिवासी आहेत. यातील विक्की याच्यावर वेगवेगळय़ा आरोपाखाली गुन्हा दाखल असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. श्री सिंह यांनी सांगितले, आरोपींना जप्त केलेले महागड्या २0 मोबाईलचे आईएमआई क्रमांक बदलविण्यात यश न आल्यानेच त्यांची विक्री करण्यात आरोपींना यश मिळाले नाही. तिन्हा आरोपींची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी या दौर्‍यादरम्यान रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल चोरी करणार्‍यांना अटक केल्याची माहितीही दिली. आशुतोष पांडे यांनी शुक्रवारी (दि.२३) गोंदिया रेल्वेस्थानकाला भेट देऊन गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या कामाचे निरीक्षण केले. दरम्यान, पत्रकार परिषदेचे आयोजन करून रेल्वे सुरक्षा दलाच्या कामाबद्दल पत्रकारांना माहिती दिली.
यावेळी गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी अधिकारी बी.एन.सिंग उपस्थित होते. यावेळी त्यांनी रेल्वे सुरक्षासंदर्भात रेल्वे सुरक्षा दलातर्फे करण्यात येणार्‍या कामांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, रेल्वेगाड्यात अवैधरित्या खाद्यान्न विकणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येत असून सुरक्षा दलाच्या जवानांना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नियमीत गस्तीसोबतच जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य पार पाडण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा?

नवी दिल्ली,दि.24(वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार आहे. यामुळे इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) हक्क आणि हिताचे रक्षण करण्याचे पूर्ण अधिकार आयोगाला मिळणार आहेत. हे विधेयक म्हणजे इतर मागासवर्गीयांची मते मिळविण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाने टाकलेले मोठे पाउल मानले जात आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर मागासवर्गीयांना सामाजिक समता आणि न्याय मिळावा, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी नेमलेल्या आयोगाला पूर्ण अधिकार देण्यासाठी घटनात्मक दर्जा मिळणे गरजेचे आहे. यामुळे आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे विधेयक लोकसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली. कोणत्या समजाला इतर मागासवर्गीयामध्ये समाविष्ट करायचे अथवा वगळायचे याची शिफारस करण्याचे मर्यादित अधिकार आयोगाला आहेत. इतर मागासवर्गीयाच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे आहे. या आयोगाकडे अनुसूचित जाती व जमातींच्या हिताचे रक्षण करण्याचीही जबाबदारी असल्याने साहजिकच इतर मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होते.
मागील अधिवेशनात सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाला घटनात्मक दर्जा दिला होता. आता याच प्रकारे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची पावले सरकारने उचलली आहेत. याबाबतचे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाले होते. नंतर राज्यसभेत हे विधेयक काही दुरुस्ती करून संमत झाले होते. यामुळे वेगवेगळी विधेयके दोन्ही सभागृहांकडून मंजूर झाली. यासाठी आता नव्याने हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहे.

भागवतांना गाेवणाऱ्या शरद पवारांना मदत का?- खा.पटोले

पुणे,दि.24(विशेष प्रतिनिधी)-‘ज्या राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारांनी भगव्या आतंकवादाचा मुद्दा काढून सरसंघचालक मोहन भागवत यांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवण्याचा प्रयत्न केला, अशांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी मदत कशी करतात?’ असा खळबळजनक प्रश्न भाजपचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी उपस्थित केला. सरसंघचालकांवर हात टाकण्याचा प्रयत्न जे करतात त्यांना फडणवीस- गडकरी मदत का करतात, याचे उत्तर मला हवे असल्याचे ते म्हणाले.पुण्यातील वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने आयोजित ‘तीन वर्षांतील फसलेले अर्थकारण’ या विषयावर देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी खासदार पटोले बोलत होते.
“मालेगाव बॉम्बस्फोटात सुधाकर चतुर्वेदी हा संघाचा कार्यकर्ता सहभागी होता. त्याने पत्रकार परिषद घेऊन या बॉम्बस्फोटात मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. याच चतुर्वेदीने शरद पवारांचेही नाव घेतले. ‘हिंदू आतंकवाद’ हा पवारांनी निर्माण केलेला शब्द असल्याचा आरोप त्याने केला. त्याच ‘राष्ट्रवादी’चे प्रफुल्ल पटेल यांनी २४ तासांच्या आत भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. मुख्यमंत्री याच ‘राष्ट्रवादी’ला दिलदार शत्रू म्हणतात. सरकारला वाचवणारे ‘अदृश्य हात’ म्हणतात. खरे तर सरसंघचालकांचे पद असे आहे की पंडित नेहरूसुद्धा त्याचा सन्मान ठेवायचे. असे असताना सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’चे कौतुक कसे केले जाते?’ असा प्रश्न पटाेले यांनी केला.
‘सध्या जो सरकारविरोधात बोलतोय, त्याला मारून टाकाल का ?” असा थेट सवाल करत खासदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर पुन्हा दडपशाहीचे गंभीर आरोप केलेत. बोलताना सोहराबुद्धीन एनकाऊंटर केसमधील जस्टीस लोया यांच्या गुढ मृत्यू प्रकरणाला स्पर्श करत मोदी-शहा यांच्या कार्यकाळात सुरू असलेल्या राजकीय दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल चढवला. जस्टीस लोया यांचे नेमके काय झाले ? असा खडा सवालच त्यांनी मोदी सरकारला विचारला. मोदी-शहांच्या कार्यकाळात भाजपमध्ये कुणालाच बोलू दिले जात नसल्याचे सांगत त्यांनी लोकशाही राजकारणातही दडपशाही फार काळ चालणार नाही, असाही इशारा दिला.
राज्यातील फडणवीस सरकार आणि राष्ट्रवादीच्या राजकीय मैत्रीवर भाष्य करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या दिलदार शूत्र विधानाचा उल्लेख करत महाराष्ट्रात फक्त एकच भूजबळ आहेत का ? असा थेट सवाल केला. केंद्र आणि राज्यातले सरकार हे हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत असल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केला.
यावेळी बोलतांना  मोदी सरकारचे आणखी एक पक्षांतर्गंत विरोधक आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचेही भाषण झाले.त्यांनीही अर्थव्यवस्थेवर थेट भाष्य करत नोटबंदीच्या निर्णयावर पुन्हा टीकास्त्रं सोडले. तसंच मोदींच्या हुकूमशाही पद्धतीवर कोरडे ओढले.” झिम्बॉम्बेत सलग तीन दशके सत्ता उपभोगलेले मुगाबे यांनाही पायउतार व्हावे लागले तर इथे इतरांची काय कथा ? ” असे खडे सुनावत पंतप्रधान मोदींना पुन्हा वास्तवाची जाणिव करून दिली. तसंच जिथे कुठे सरकार चुकीचे वागेल त्याविरोधात मी यापुढेही बोलणारच कारण भारतातली लोकशाही वाचलीच पाहिजे, असेही सिन्हा म्हणाले. मला कुठले पद हवे म्हणून सरकारविरोधात बोलत नाहीतर लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवतोय. असा निर्वाळाही सिन्हा यांनी दिला.

मोदी अर्थकारणात ‘फेल’- यशवंत सिन्हा

 पुणे,दि.24 - जीएसटी ही सर्वोत्तम अप्रत्यक्ष करप्रणाली असली तरी ती का लागू करू नये, याचे प्रत्यक्ष उदाहरण भारताने जगाला दाखविले आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी  केले आहे. माजी केंद्रीय अर्थसचिव डॉ. विजय केळकर यांना सरकारने परत बोलावून  जीएसटीमध्ये मूलभूत बदल करावेत, असा सल्लाही सिन्हा यांनी केंद्रसरकारला दिला आहे.


माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील जन्मशताब्दीनिमित्त वसंतदादा सेवा संस्थेने आयोजिलेल्या ‘तीन वर्षांतील फसलेले अर्थकारण’ (नोटाबंदी, जीएसटीचे अपयश) या कार्यक्रमात ते बोलत होते.  माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर अध्यक्षस्थानी होते.

जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुका अधोरेखित करतानाच पेट्रोलच्या दरात कपात न केल्याबद्दलही सिन्हा यांनी मोदी सरकारवर टीका केला. ते म्हणाले, ‘जीएसटीमध्ये कररचनेचे जास्तीत जास्त दोन किंवा तीन दर असायला हवेत. भारतात जीएसटी लागू करताना पाच, सहा दर लागू केले गेले. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या कपातीचा कोणताही फायदा सरकारने नागरिकांना दिला नाही. या इंधनाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमती सरकार आपल्या नियंत्रणात आणू शकत नाही. त्यामुळे भविष्यात इंधनाच्या किमती वाढल्या तर देशाची अर्थव्यवस्था ढासळायला वेळ लागणार नाही इतकी आपली परिस्थिती नाजूक आहे.’
राज्यातील सरकारला लक्ष्य करताना यांनी छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. अवैध संपत्तीचा आरोप असलेले भुजबळ हे एकमेव आहेत का, असा सवाल त्यांनी केला. केवळ महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत म्हणून भुजबळांना वेगळा न्याय लावला जात असेल, तर त्यावर आवाज उठवलाच पाहिजे, असे पटोले म्हणाले.

चार वर्षांच्या मुलावर बलात्काराचा आरोप


नवी दिल्ली,दि.24 (वृत्तसंस्था)- एका चार वर्षीय बालकाने आपल्या चार वर्षीय वर्गमैत्रिणीवर पेन्सिलच्या साह्याने लैंगिक हल्ला केल्याची खळबळजनक घटना दिल्लीतील द्वारका भागातील एका शाळेत घडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सात वर्षांखालील बालकांवर कायद्याने गुन्हा दाखल करता येत नसल्याने, या प्रकरणी काय कारवाई करावी, याबाबत पोलिस कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे समजते. या प्रकरणी शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी शाळेतून घरी आल्यावर या मुलीने आपल्याला वेदना होत असल्याची तक्रार केली. वर्गातील एका मुलाने आपल्याशी केलेला गैरप्रकार तिने आईला कथन केला. त्यावेळी तिथे ‘शिक्षक किंवा दीदी’ यापैकी कोणीही नव्हते. मुलीवर लैंगिक हल्ला झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्याचे कळते. मुलीच्या पालकांनी शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुख्याध्यापक, शिक्षक तसेच समन्वयकांनी कोणतीही मदत न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्या मुलाला शाळेतून काढून टाकावे, अशी मागणीही या मुलीच्या आईने केली. दरम्यान, दिल्लीच्या बालहक्क संरक्षण आयोगाने या शाळेचे मुख्याध्यापक व अन्य तीन कर्मचाऱ्यांना सोमवारी आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

हत्या सत्राने नागपूरकर दहशतीत

नागपूर,दि.24 -  गेल्या महिनाभरापासून शहरातील विविध भागात हत्यासत्र सुरू झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्य २१ नोव्हेंबरला राहुल आग्रेकर या युवकाचे लकडगंज भागातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. असे असताना पुन्हा काल गुरुवारी पुन्हा ८ तासात दोघांच्या हत्या झाल्याने पोलिसातही खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी दिनेश धरमसिंग उईके (वय ३०, रा. दाते ले-आऊट) आणि दिनेश अशोक कोटांगळे (वय २५, रा. पन्नासे ले-आऊट) हे दोघे प्रतापनगरातील मजुरांच्या ठिय्यावर उभे होते. काम न मिळाल्याने ते सोबतच दारू प्यायला गेले. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास मेंढे ले-आउटमधील रचना अपार्टमेंटजवळ त्यांच्यात वाद सुरू झाला. उईकेने कोटांगळेच्या पत्नीला उद्देशून शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या कोटांगळेने उईकेच्या डोक्यावर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर पळून गेला. माहिती कळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी शोधाशोध करून आरोपीला अटक केली.

दुसरी घटना रात्री १० च्या सुमारास खलासी लाईन, सदरमध्ये घडली. आरोपी प्रवीण चरणदास हुमणे आणि मृत अविनाश अरविंद मेहरा (वय ३३) हे दोघे साळे-भाटवे होत. ते मिलिंद तायवाडेच्या घरी भाड्याने राहत होते. मृत मेहराला दारूचे व्यसन होते. तो घरी आल्यानंतर पत्नीला बेदम मारहाण करायचा. गुरुवारी रात्री असेच झाले. मेहरा दारूच्या नशेत आला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तिचे दोन आठवड्यांपूर्वीच आॅपरेशन झाले आहे. ती वेदनांनी तडफडत भावाच्या घरी गेली. तिच्या मागेच मेहरा आला. ते पाहून त्याचा साळा प्रवीण याने बाजूची काठी उचलून मेहराच्या डोक्यावर मारली. एकाच फटक्यात मेहरा खाली पडला आणि गतप्राण झाला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी सदर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याच्या तयारीतील आरोपी प्रवीणला अटक केली.

द गामा-पटना एक्स्प्रेस रुळावरून घसरलीः 3 मृत


वास्को-द-गामा एक्स्प्रेसचे १३ डबे घसरले, तिघांचा मृत्यू
पाटणा,दि.24 - उत्तर प्रदेशमधल्या बांदा जिल्ह्यातील माणिकपूर रेल्वे स्थानकावर 13 डब्यांची वास्को द गामा-पटना एक्स्प्रेस रुळावरून घसरली आहे. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी आहेत. रेल्वे रूळ तुटल्यामुळे पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे ट्रेन चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाल्याचीही चर्चा आहे.  पटना- गोवा रेल्वे मार्गावर अपघात झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला असून, इतर ट्रेनचं वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे. बचावकार्याचं पथक आणि डॉक्टर्स घटनास्थळी दाखल झाले असून, रेल्वेनं हेल्पलाइनही सुरू केली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...