Saturday, 21 September 2019

बस फेरी बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे बेहाल




आमगाव,दि.21 : येथे शैक्षणिक महाविद्यालय असून शिक्षण घेण्यासाठी खेड्यापाड्यातुन अनेक विद्यार्थी एसटी बसने ये जा करतात. मात्र देवरी मार्गावरील सायंकाळच्या वेळेतील बस फेरी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
 बस अभावी विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी ८ वाजत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे तरी कसे असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी बस सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. महामंडळाच्या बसमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याची सोय झाली. मात्र आता याच विभागाच्या लेटलतीफ धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. आमगाव येथे विविध शाळा आणि महाविद्यालय असल्याने २५ ते ३० कि.मी.अंतरावरील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी बसने ये-जा करतात. मात्र मागील काही दिवसांपासून देवरी मार्गावरील सायंकाळची बस फेरी आगाराने बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सालेकसा, डोमाटोला, कालीसरार, हरदोली, पाऊलदौना हा परिसर जंगल व्याप्त आहे. या परिसरातील विद्यार्थी बसने शिक्षणासाठी आमगावला येतात. शाळा सुटल्यावर बसने परत जातात. मात्र बस वेळेवर येत नसल्याने शाळेत पोहचायला उशीर होतो. तर शाळा सुटल्यावर बसची वाट पाहात राहावे लागते. अशातच सायंकाळी पाच वाजताची देवरी बसफेरी बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.डोमाटोला व चिचगड बस साडेसहा वाजताच्या सुमारास येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास आठ नऊ वाजता. जेव्हापर्यंत बस येत नाही तेव्हापर्यंत शिक्षकांना सुध्दा आपली जबाबदारी म्हणून बसस्थानकावर थांबावे लागते.विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास उशीर होत असल्याने पालकांची सुध्दा चिंता वाढली आहे. तर विद्यार्थी घरी उशीरा पोहचत असल्याने त्यांना सुध्दा अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. आगारात बसेसची संख्या कमी झाल्याने या मार्गावरील बस फेरी बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मागील पंधरा दिवसांपासून ही समस्या आहे पण याची अद्याप लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने दखल घेतली नाही.

Friday, 20 September 2019

घनश्याम शेंडे यांचे अपघाती निधन

नवेगावबांध,दि.20ः- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील परिषदेच्या शाळेतून सुट्टीनंतर घरी जाण्यासाठी निघालेले शिक्षक घनशाम कृपाल शेंडे (रा.सडक/अर्जुनी) यांचे आज मालवाहू मीनीडोरने दिलेल्या धडकेत अपघाती दुःखद निधन झाले.नवेगांवबांध येथुन गोंदिया निवासी अजय चौहान यांचे मोटार सायकल क्र MH 35 V 6611 ने ते सडक अर्जुनीला येत असता मागेहुन वेगात येणाऱ्या मालवाहक मीनीडोरने जोरदार धडक दिली.लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालय नवेगांबांध येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान शेंडे यांचे निधन झाले.

वृत्त प्रकाशित होताच चिचगडचे अप्पर तहसील कार्यालय सुरू

बेरारटाईम्सच्या बातमीचा दणका


गोंदिया, दि.20 - निवडणुकीच्या तोंडावर देवरी तालुक्यातील चिचगड येथे राज्य शासनाच्या वतीने अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन केले होते. मात्र, उद्धाटनाचे सोपस्कार पार पाडून सदर कार्यालय नियमित सुरू करण्याचा विसर प्रशासनाला पडला होता. त्यामुळे या कार्यालयाला घेऊन नागरिकांमध्ये अनेक तर्क वितर्क लावणे सुरू झाले होते. नागरिकांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बेरारटाईम्स न्यूज पोर्टल ने काल चिचगडचे तहसील कार्यालय अद्यापही अधांतरित या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केली होती. या वृत्तामुळे प्रशासनामध्ये चांगलीच खडबड उडाली. परिणामी, प्रशासनाने याविषयी तत्काल पावले उचलत आज शुक्रवारी (दि.20) सदर तहसील कार्यालय सुरू केले.  दरम्यान, चिचगड परिसरातील नागरिकांनी या विषयी बेरारटाईम्स न्यूज पोर्टलचे आभार मानले, हे येथे उल्लेखनीय






Thursday, 19 September 2019

रेलटोली परिसरात पकडली रिमोटव्दारे होणारी वीज चोरी

गोंदिया,दि.19 : वीज वितरण कंपनीतर्फे शहरात वीज चोरी पकडण्याची मोहीम मंगळवारपासून सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान शहरातील रेलटोली परिसरात रिमोटव्दारे वीज चोरी करणाऱ्या एका ग्राहकाला भरारी पथकाने पकडले. त्याच्यावर दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला.महावितरणचे कार्यकारी अभियंता शरद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता अश्विन शहाणे व सहाय्यक अभियंता सुनील रेवतकर हे मंगळवारी रेलटोली परिसरात वीज चोरीची शोध मोहीम राबवित होते. 
या दरम्यान रेलटोली येथील एका वीज ग्राहकाच्या घरातील विद्युत मीटरची तपासणी केली. त्यांच्या घरी होत असलेल्या विजेच्या वापरापेक्षा प्रत्यक्षात कमी मीटर रिडींग होत असल्याचे आढळले.त्यामुळे विद्युत मीटरची तपासणी केली असता त्यात छेडछाड केल्याचे आढळले. त्यांनी तपासणी केली असता रिमोटव्दारे मीटर रिडींग कमी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.पथकाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहकाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळटाळ केली. मात्र पोलीस कारवाई होणार असल्याचे सांगताच त्यांनी विद्युत मिटरची रिडींग कमी करण्यासाठी वापर करीत असलेले रिमोट दिले. त्यानंतर सदर रिमोटचा रिडींग कमी करण्यासाठी कसा वापर केला जातो याची पाहणी करण्यासाठी त्यांनी विद्युत मीटर उघडून पाहिले. तेव्हा या वीज चोरीचे बिंग फुटले.हे रिमोट कुठून खरेदी केले अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केली असता त्यांनी याची माहिती देण्यास टाळटाळ केली. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी मीटर रिडींग कमी करण्यासाठी विद्युत मीटरमध्ये लावलेली किट आणि रिमोट जप्त केला. विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार १ लाख ४३ हजार ५७० रुपयांचा दंड आकारला.सदर ग्राहकाने दंड भरण्याची तयारी दर्शविल्याने फौजदारी कारवाई करणे टाळण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य तंत्रज्ञ राजू उके यांच्या नेतृत्त्वात शहरात वीज चोरीची शोध मोहीम राबविण्यात येत आहे.रिमोट तयार करणारे रॅकेट सक्रियगोंदिया जिल्ह्यात आठ वर्षांपूर्वी सुध्दा रिमोटव्दारे विद्युत मिटर तयार करणाऱ्यांची टोळी महावितरणच्या अधिकाºयांनी पकडली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरातील रेलटोली परिसरातील एका वीज ग्राहकाच्या घरी असलेल्या विद्युत मीटरमध्ये लावली किट आणि रिमोट पकडले. त्यामुळे हे रिमोट तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आहे.महावितरणसमोर आव्हानविद्युत वितरण कंपनीतर्फे वीज चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे.

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा कुंभीवासीयांचा इशारा

गडचिरोली,दि.१९: नदीवर पूल नसल्याने तीन वर्षांत दोन मुलांचे जीव गेले. बैलजोड्याही वाहून गेल्या, शेतीचे अतोनात नुकसान झाले. परंतु ना प्रशासनाने दखल घेतली, ना लोकप्रतिनिधींनी. त्यामुळे गावातील सर्व मतदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा कुंभी(मोकासा) येथील गावकऱ्यांनी  पत्रकार परिषदेत दिला.पत्रकार परिषदेला यश्वगीता गेडाम, देविदास मोहुर्ले, विजय मडावी, तुळशीराम मेश्राम, रिपीन वाटगुरे, मोरेश्वर चौधरी, निवृत्ता नैताम, पुष्पा सोनुले, वैशाली सोनुले, डिम्पल बांबोळे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.
कुंभी येथील अनेक महिला व पुरुष आज गडचिरोलीत आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुंभी(मोकासा)हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. कुंभी गावची लोकसंख्या ३७५ तर शेजारच्या माडेमूल गावची लोकसंख्या ३५० च्या आसपास आहे. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे गावातील २० ते २५ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी चांदाळा, गडचिरोली व अन्य गावांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करतात.
या गावाच्या आधी शंभर मीटर अंतरावर पोटफोडी नदी वाहते. हीच स्थिती शेजारच्या माडेमूल गावाची आहे. परंतु नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात अनेक वेळा नदीला पूर येऊन आठ-आठ दिवस संपर्क तुटतो. गावात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेणे अवघड होते. २०१५-१६ मध्ये निकेश बांबोळे या शेतकऱ्याची बैलजोडी पुरात वाहून गेली. तसेच माडेमूल येथील एक इसम वाहून गेला. २०१६-१७ मध्ये चांदाळा येथील पाचव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी नदीच्या पुरात वाहून गेला. त्यानंतर यंदा २१ ऑगस्टला तिसरीचा विद्यार्थी हेमंत निकुरे हादेखील वाहून गेला. परंतु प्रशासनाने कुठलीही मदत केली नाही. गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवून दुसऱ्या दिवशी दुपारी विहीरगाव येथील पुलाखालून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
गावात कृषीसहायकाचा पत्ता नाही. तलाठीही येत नाही. पुलासंदर्भात प्रशासनाने काहीही केले नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत उमेदवारांनी पूल तयार करुन देण्याचे आश्वासन दिले. परंतु निवडून आल्यावर प्रत्यक्षात काहीही केले नाही. त्यामुळे कुंभी व माडेमूल गावचे मतदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

चिचगडचे तहसील कार्यालय अद्यापही अधांतरीच

उद्घाटनाला दहा दिवस उलटून अद्यापही कार्यालय बंदच

ही सुद्धा सरकारची जुमलबाजी तर नाही?  नागरिकांची प्रतिक्रिया

चिचगड,दि.18 -  आदिवासी, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील जनतेला प्रशासकीय कामासाठी लांब अतंरावर जाऊन हेलपाटे खावे लागू नये, यासाठी देवरी तालुक्यातील चिचगड परिसरातील नागरिकांची बहुप्रतिक्षित अशी चिचगड तालुक्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या 10 दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे हस्ते चिचगड येथे मोठा गाजावाजा करीत अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, अद्यापही या कार्यालयाचे कुलूपमात्र उघडले नसून येथे नियुक्त अप्पर तहसीलदार सुद्धा नदारत आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी ही सरकारची जुमलेबाजी तर नसावी ना  ? अशी प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
सविस्तर असे की, देवरी तालुका हा आदिवासीबहुल, अतिदुर्गम, मागास आणि नक्षलग्रस्त तालुका आहे. या मध्ये चिचगड परिसरातील गावांचा समावेश होतो. चिचगडपासून देवरीचे अंतर सुमारे 20 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यामुळे या परिसरातील लोकांना सुमारे 50 किमीपेक्षा लांबचे अंतर कापून छोट्या छोट्या कामासाठी देवरी गाठावी लागत आहे. प्रवासाची अत्यल्प साधने आणि अपुरा पडणारा वेळ यामुळे या भागातील लोकांना प्रशासकीय कामे करण्यासाठी खूप मानसिक, आर्थिक आणि शारिरीक कष्ट सोसावे लागत आहेत. परिणामी, चिचगडला स्वतंत्र तहसील कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.
यावर्षी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे अशा अनेक संधीचे सोने करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी झपाट्याने कामाला लागले असल्याचे चित्र संपूर्ण विधानसभा क्षेत्रात बघावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भूमिपूजन आणि उद्घाटनाचा सपाटा या मतदार संघात लावला आहे. त्यामध्ये बहुप्रतिक्षित असलेले चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाचे उदघाटन सुद्धा  गेल्या 10 तारखेला पालकमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या धडाक्यात करण्यात आला. या कार्यालयाला कोणी उके नावाचे अप्पर तहसीलदार नियुक्त झाल्याची सुद्धा चर्चा आहे. मात्र. 10 दिवस उलटून सुद्धा या कार्यालयाचे कुलुप अध्यापही उघडले नाही. याशिवाय येथे नियुक्त तहसीलदार सुद्धा गायब असल्याने नागरिक अनेक शंका कुशंका व्यक्त करू लागले आहेत.
लाखो रुपयांची उधळपट्टी करून सुरू करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयात सरकारने एकही कर्मचारी मात्र नियुक्त केला नसल्याने ही निवडणुकीच्या तोंडावर जुमलबाजी तर नसावी ना, अशी टीका आता नागरिक करू लागले आहेत. परिणामी, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने येथे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी काम सुरू करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी नागरिकांनी सरकारकडे केली आहे.

अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त- उपविभागीय अधिकारी राठोड
  
 चिचगडच्या अप्पर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण  येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यात व्यस्त असल्यामुळे त्याठिकाणी कर्मचारी  पाठविता आले नाही.  विधानसभेची  निवडणुक आटोपल्यावर त्या कार्यालयाला लगेच सुरवात करण्यात येईल व काही कर्मचाऱ्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे सुट्टीवर आहेत. 

चिचेवाडा ग्रामसभेची सक्षमतेकडे वाटचाल

कुरखेडा, दि.18- तालुक्यातील चिचेवाडा येथे 'दिल्ली, मुंबईत आमचे सरकार-आमच्या गावात आम्ही सरकार' या घोषवाक्याप्रमाणे आम्ही आमच्या आरोग्यासाठी व ग्रामसभा चिचेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय मडावी होते. यावेळी कोरची महाग्रामसभेचे सल्लागार इजामसाय काटेंगे, तालुका कृषी अधिकारी रामटेके, कृषी सहाय्यक क्षिरसागर, आम्ही आमच्या आरोग्यासाठीच्या प्रतिमा नंदेश्‍वर उपस्थित होते.अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना अजय मडावी यांनी गावाच्या विकासासाठी व ग्रामसभा सक्षम होण्याच्या दृष्टीने ग्रामसभेची भूमिका काय असावी, याबद्दल माहिती दिली. इजामसाय काटेंगे यांनी 'आपण आपला मार्ग शोधू' या म्हणीप्रमाणे वनाचे व्यवस्थापन, जल जमीन, जंगलाच्या संसाधनावरील अधिकार व मालकी हक्क २00६ च्या वनहक्क अधिनियमांतर्गत चिचेवाडा ग्रामसभेला ३६३ हे.आर. क्षेत्र जंगलाचे अधिकार अभिलेख जोडपत्र मिळालेले आहे. या अधिकाराचा वापर करून ग्रामसभेने जंगलावरचे अधिकार प्राप्त केले आहेत. ग्रामसभा वनाचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापन करीत आहे. तसेच निस्तार हक्क, पेसा कायदा, २00६ वनहक्क कायदा, माहितीचा अधिकार अशा कायद्याचा अभ्यास व वापर करून ग्रामसभा सक्षमतेच्या दिशेने वाटचाल करू शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी रामटेके यांनी आपल्या भाषणातून सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. सेंद्रिय शेती, रासायनिक शेती मधील फरक सांगितला. तसेच कृषी विभागामार्फत विविध योजनाची माहिती दिली. फळबाग, बांधावर झाडे, तुषार, ठिंबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, जैविक खते, कीड नियंत्रण, अशा विविध विषयावर मार्गदर्शन करून शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. संचालन मनोज चव्हान तर प्रास्ताविक प्रेमलाल किरनापुरे यांनी केले. आभार देवाजी वटी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील महिला, पुरूष व युवकांनी सहकार्य केले.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...