Thursday 19 September 2019

चिचगडचे तहसील कार्यालय अद्यापही अधांतरीच

उद्घाटनाला दहा दिवस उलटून अद्यापही कार्यालय बंदच

ही सुद्धा सरकारची जुमलबाजी तर नाही?  नागरिकांची प्रतिक्रिया

चिचगड,दि.18 -  आदिवासी, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील जनतेला प्रशासकीय कामासाठी लांब अतंरावर जाऊन हेलपाटे खावे लागू नये, यासाठी देवरी तालुक्यातील चिचगड परिसरातील नागरिकांची बहुप्रतिक्षित अशी चिचगड तालुक्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या 10 दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे हस्ते चिचगड येथे मोठा गाजावाजा करीत अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, अद्यापही या कार्यालयाचे कुलूपमात्र उघडले नसून येथे नियुक्त अप्पर तहसीलदार सुद्धा नदारत आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी ही सरकारची जुमलेबाजी तर नसावी ना  ? अशी प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
सविस्तर असे की, देवरी तालुका हा आदिवासीबहुल, अतिदुर्गम, मागास आणि नक्षलग्रस्त तालुका आहे. या मध्ये चिचगड परिसरातील गावांचा समावेश होतो. चिचगडपासून देवरीचे अंतर सुमारे 20 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यामुळे या परिसरातील लोकांना सुमारे 50 किमीपेक्षा लांबचे अंतर कापून छोट्या छोट्या कामासाठी देवरी गाठावी लागत आहे. प्रवासाची अत्यल्प साधने आणि अपुरा पडणारा वेळ यामुळे या भागातील लोकांना प्रशासकीय कामे करण्यासाठी खूप मानसिक, आर्थिक आणि शारिरीक कष्ट सोसावे लागत आहेत. परिणामी, चिचगडला स्वतंत्र तहसील कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.
यावर्षी राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे अशा अनेक संधीचे सोने करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी झपाट्याने कामाला लागले असल्याचे चित्र संपूर्ण विधानसभा क्षेत्रात बघावयास मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भूमिपूजन आणि उद्घाटनाचा सपाटा या मतदार संघात लावला आहे. त्यामध्ये बहुप्रतिक्षित असलेले चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाचे उदघाटन सुद्धा  गेल्या 10 तारखेला पालकमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या धडाक्यात करण्यात आला. या कार्यालयाला कोणी उके नावाचे अप्पर तहसीलदार नियुक्त झाल्याची सुद्धा चर्चा आहे. मात्र. 10 दिवस उलटून सुद्धा या कार्यालयाचे कुलुप अध्यापही उघडले नाही. याशिवाय येथे नियुक्त तहसीलदार सुद्धा गायब असल्याने नागरिक अनेक शंका कुशंका व्यक्त करू लागले आहेत.
लाखो रुपयांची उधळपट्टी करून सुरू करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयात सरकारने एकही कर्मचारी मात्र नियुक्त केला नसल्याने ही निवडणुकीच्या तोंडावर जुमलबाजी तर नसावी ना, अशी टीका आता नागरिक करू लागले आहेत. परिणामी, लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने येथे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी काम सुरू करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी नागरिकांनी सरकारकडे केली आहे.

अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त- उपविभागीय अधिकारी राठोड
  
 चिचगडच्या अप्पर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण  येणाऱ्या निवडणुकीच्या कार्यात व्यस्त असल्यामुळे त्याठिकाणी कर्मचारी  पाठविता आले नाही.  विधानसभेची  निवडणुक आटोपल्यावर त्या कार्यालयाला लगेच सुरवात करण्यात येईल व काही कर्मचाऱ्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे सुट्टीवर आहेत. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...