Thursday 19 September 2019

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा कुंभीवासीयांचा इशारा

गडचिरोली,दि.१९: नदीवर पूल नसल्याने तीन वर्षांत दोन मुलांचे जीव गेले. बैलजोड्याही वाहून गेल्या, शेतीचे अतोनात नुकसान झाले. परंतु ना प्रशासनाने दखल घेतली, ना लोकप्रतिनिधींनी. त्यामुळे गावातील सर्व मतदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा कुंभी(मोकासा) येथील गावकऱ्यांनी  पत्रकार परिषदेत दिला.पत्रकार परिषदेला यश्वगीता गेडाम, देविदास मोहुर्ले, विजय मडावी, तुळशीराम मेश्राम, रिपीन वाटगुरे, मोरेश्वर चौधरी, निवृत्ता नैताम, पुष्पा सोनुले, वैशाली सोनुले, डिम्पल बांबोळे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.
कुंभी येथील अनेक महिला व पुरुष आज गडचिरोलीत आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुंभी(मोकासा)हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. कुंभी गावची लोकसंख्या ३७५ तर शेजारच्या माडेमूल गावची लोकसंख्या ३५० च्या आसपास आहे. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे गावातील २० ते २५ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी चांदाळा, गडचिरोली व अन्य गावांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करतात.
या गावाच्या आधी शंभर मीटर अंतरावर पोटफोडी नदी वाहते. हीच स्थिती शेजारच्या माडेमूल गावाची आहे. परंतु नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात अनेक वेळा नदीला पूर येऊन आठ-आठ दिवस संपर्क तुटतो. गावात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेणे अवघड होते. २०१५-१६ मध्ये निकेश बांबोळे या शेतकऱ्याची बैलजोडी पुरात वाहून गेली. तसेच माडेमूल येथील एक इसम वाहून गेला. २०१६-१७ मध्ये चांदाळा येथील पाचव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी नदीच्या पुरात वाहून गेला. त्यानंतर यंदा २१ ऑगस्टला तिसरीचा विद्यार्थी हेमंत निकुरे हादेखील वाहून गेला. परंतु प्रशासनाने कुठलीही मदत केली नाही. गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवून दुसऱ्या दिवशी दुपारी विहीरगाव येथील पुलाखालून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
गावात कृषीसहायकाचा पत्ता नाही. तलाठीही येत नाही. पुलासंदर्भात प्रशासनाने काहीही केले नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत उमेदवारांनी पूल तयार करुन देण्याचे आश्वासन दिले. परंतु निवडून आल्यावर प्रत्यक्षात काहीही केले नाही. त्यामुळे कुंभी व माडेमूल गावचे मतदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...