Sunday, 8 September 2019

जनजागृती मोहिमेत प्रसार माध्यमांची भूमिका मोलाची -डॉ. कादम्बरी बलकवडे



जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त

गोंदिया दि.8:  भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट कार्यप्रणालीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रसार माध्यमांच्या वतीने सूरु आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या प्रसिध्दी व्यापक प्रमाणात असली तरी प्रसारमाध्यमांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात माहिती होणे आवश्यक असून जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रसार माध्यमांसाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष तपासणी प्रशिक्षण व माहिती कार्यक्रम आज दि. 7 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, येत्या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन तयारीत असून 1281 मतदान केन्द्र कार्यान्वीत करण्यात येतील. तसेच 1 मतदान केन्द्राची परवानगी निवडणूकपूर्व मिळणार असल्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत या वेळेस आता पर्यंत 11 हजार 600 महिला व 8 हजार 904 पुरुष मतदारांची नवमतदार म्हणून नोंदणी झाली आहे. त्या म्हणाल्या की, 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची नोंदणी मागील निवडणूकीत 1.09 टक्के असून या वेळेस सदर टक्केवारीत वाढ झाली असून 1.71 टक्के झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत 10 लाख 23 हजार 865 मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट असून या वेळेस आतापर्यंत 10 लाख 96 हजार 441 नावे मतदार यादीत आहेत. म्हणजे या निवडणूकीत 5 लाख 44 हजार 619 पुरुष मतदार तर 5 लाख 51 हजार 820 महिला मतदार तथा 1 हजार 792 सर्विस वोटर आपले मताधिकारचा वापर करणार आहेत.
 पुढे माहिती देताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, जिल्ह्यात 96.59 टक्के मतदारांना ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहेत. तसेच मतदार यादीत 96.65 टक्के फोटो उपलब्ध आहेत. या निवडणुकीत महिलाबुथ व्यतिरीक्त 1 दिव्यांग मतदान केन्द्र स्थापन करण्याचे उदिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी या वेळेस दिली. सदर मतदान केन्द्राचे संचालन दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करतील या प्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. 
जिल्ह्यात एकुण 3 हजार 376 मतदारांची दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी झाली असून मतदान केंद्रांवर त्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळेस सर्व मतदारांना ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असल्यास त्यांनी ही www.nvsp.in तसेच www.ceo.maharashtra.govt.in या सांकेतिक स्थळावर भेट देऊन आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी  बलकवडे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमात कॅन्ट्रोल युनिट, बॅलेट युनिट, तथा व्हीव्हीपॅटच्या कार्यप्रणाली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थितांनी प्रत्यक्ष मतदान करुन कंट्रोल युनिटची संपूर्ण कार्यप्रणालीचा अनुभव घेतला असून समाधान व्यक्त केले. या ठिकाणी मतदान प्रक्रिया, मतचाचणी प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रिया करण्यात आली. तसेच ज्यांना मतदान करण्यात आले होते, त्यांनाच मतदान झाले कि नाही या बाबत खात्री पटवून देण्यात आली. या नंतर उपस्थितांच्या प्रश्नांची व मनातील शंकाचे निरसन करण्यात आले असून माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने उपजिल्हाधिकारी निवडणूक सुभाष चौधरी, सहा. अधीक्षक निवडणूक हरीशचंद्र मडावी, अ.का. नोखलाल कटरे, कनिष्ठ प्रोग्रामर प्रवीण गडे, प्रणय तांबे कनिष्ठ अभियंता तसेच निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी तथा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...