Saturday 21 September 2019

सुंदरीदंड येथे जनजागरण मेळावा

देवरी पोलिस विभागाचा उपक्रम

देवरी,दि.21 - गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वतीने देवरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुंदरीदंड (मुरपार) येथे आज शनिवारी (दि.21) एक दिवसीय जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव हे होते. यावेळी नक्षलसेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश भास्कर, देवरीचे तलाठी सचिन तितरे,तालुका कृषी अधिकारी जमदाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे आणि देवरी उपविभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली आज तालुक्यातील सुंदरीदंड (मुरपार) येथे पोलिस विभागाच्या वतीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात  महसूल, आरोग्य आणि कृषी विभागाने सुद्धा आपला सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांना तलाठी तितरे यांनी ईव्हीएम मशिन आणि व्ही व्ही पॅट मशिनविषयी मार्गदर्शऩ करून मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. श्री. जमदाडे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना आणि कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी नक्षलसेलचे नागेश भास्कर यांनी नक्षल चळवळीची दुष्परिणामाविषयी नागरिकांचे सविस्तर मार्गदर्शन करून नक्षल चळवळीने लोकांचे कोणकोणते नुकसान होतात, याची माहिती देत नक्षल चळवळीचा भंडाफोड केला. नक्षल्यांच्या विघातक कृत्याची माहिती देत नागरिकांनी नक्षल चळवळीपासून दूर राहण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. डॉ, सुनील येरणे यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक माहिती दिली. दरम्यान, या शिबीरामध्ये 118 जणांच्या आरोग्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. ठाणेदार बच्छाव यांनी पोलिस आणि नागरिक यांच्यात सलोख्याचे संबंध कसे निर्माण होतील यावर मार्गदर्शन केले. पोलिसांना आपले मित्र मानून आपल्या मनातील पोलिसांविषयी असलेली भीती दूर करण्याचे आवाहन सुद्धा श्री. बच्छाव यांनी केले.
यावेळी नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी देवरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...