Wednesday, 18 September 2019

ग्रामसेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात


आमगाव,दि.18- आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामसेवक दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात आज बुधवारी (दि.18) अडकला. त्या लाचखोर ग्रामसेवकांवर आमगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर असे की, स्थानिक गोसाईटोला येथील तक्रारदार हा व्यवसायाने कंत्राटदार आहे. सन 2018-19 साली गोसाईटोला ते नंगपूरा या रोडवर नाल्या बांधकामाचे कंत्राट त्याने ग्रामपंचायतीकडून मिळवले होते. ते काम त्याने मुदतीत पूर्ण करून  1 लाख 59 हजार 400 रुपयाचे देयक ग्रामपंचायतीकडे सादर केले होते. या कामाचे देयक काढण्यासाठी ग्रामसेवक प्रल्हाद रूपचंद चौधरी याने फिर्यादीकडे 2 हजार लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने गोंदियाच्या लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली.
 लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी प्रकरणाची शहानिशा करून  आरोपी विरुद्ध सापळ्याचे नियोजन केले. आज बुधवारी फिर्यादीचे देयक अदा करण्याचा मोबदला म्हणून आरोपीने 2 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आरोपीस रंगेहाथ पकडले. सदर प्रकरणी ग्रामसेवक चौधरी याचे विरुद्ध आमगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान चौधरी याच्या गोंदिया येथील राहत्या घराची झडती घेण्यात आली.
या कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री पाटील, फौजदार विजय खोब्रागडे, तुमडे. राजेश शेंद्रे, रणजित बिसेन, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, डिगांबर जाधव, वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंद मारबते सहभागी होते

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...