Saturday, 14 September 2019

बस नादुरुस्त झाल्यास आता एसटी करणार प्रवाशांची सोय


मागाहून येणाऱ्या कोणत्याही बसेस मधून केली जाणार सोय


देवरी,दि.14- मार्गात नादुरुस्त वा अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना आता मागाहून प्रथम येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बसमधून पुढील प्रवासाची सोय करण्यात येईल, अशा आशयाचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्या 11 सप्टेंबर रोजी काढले आहे.
आतापर्यंत एसटी बसच्या नियत मार्गात साधारण बसमध्ये बिघाड किंवा अपघात उद्भवल्यास केवळ त्याच दर्जाच्या बसमधून प्रवाशांना नियोजित जागी नेण्यात येत होते. याशिवाय ज्या प्रवाशांनी जलद वा अतिजलद गाडीने पुढे जायचे झाल्याने अशा प्रवाशांना त्या बसचे प्रवासभाडे अदा करावे लागत होते. त्यामुळे याबाबत राज्य महामंडळाच्या प्रवाशांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नाराजी होती. यावर महामंडळाने तोडगा काढला असून यापुढे अशी परिस्थिती उद्भवल्यास नादुरुस्त बसमधील प्रवाशांना आता मागाहून प्रथम येणाऱ्या कोणत्याही बसने पुढच्या प्रवाशांसाठी वा नजीकच्या बसस्थानकापर्यंत सोडण्यात येईल. यासाठी अशा प्रवाशांना अतिरिक्त कोणतेही प्रवासभाडे द्यावे लागणार नाही. या विषयीचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला असून  त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सर्व विभागीय नियंत्रक कार्यालयास सूचना दिली आहे. यामुळे प्रवाशांना याबाबतीत दिलासा मिळाला असून गोंदिया आगाराचे सदस्य नरेश जैन यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांचे आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...