Thursday, 9 January 2020

“राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ गोंदिया” संघटनेचे गठण

➡जिल्हाध्यक्षपदी संदिप तिडके तर सरचिटणीसपदी रवि अंबूले यांची निवड
➡ ओबीसी समाजाच्या हिस्सेदारीसाठी शेवटपर्यंत लढा देवू…ओबीसी कर्मचारी बांधवांचा निर्धार
गोंदिया,दि.09ः- राष्‍ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया शाखेचे संघटन करण्यासाठी जिल्हांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांची सभा शिक्षक पतसंस्था गोंदिया येथे ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी जिल्हास्तरावर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी व ओबीसी समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळाले पाहिजे व स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे आदी मागण्यासाठी जिल्हास्तरावर राष्ट्रीय ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघ शाखा गोंदियाचे गठण करण्याचा निर्णय घेतला.
ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून शिक्षक पतसंस्थेचे संचालक संदीप तिडके यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.तर जिल्हा सरचिटणीस रवी अंबूले,कार्यालयीन चिटणीस हेमंत पटले,उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर व एन.बी.बिसेन, कार्याध्यक्षपदी केदार गोटेफोडे, किशोर डोंगरवार ,जिल्हा सहसचिव सतीश दमाहे, लिकेश हिरापुरे व प्रमोद शहारे, कोषाध्यक्ष अनिरुद्ध मेश्राम, सहकोषाध्यक्ष रेशीम कापगते, सूरेंद्र गौतम व शितल कनपटे, संघटक राज कडव, प्रसिद्धीप्रमुख विनोद लिचडे, मुकेश रहांगडाले, लाखेश्वर लंजे, तुषार सिंगणजूडे, संतोष बारेवार, महिला प्रतीनीधी संगीताताई पाथोडे, मुख्य सल्लागार म्हणून एस यु वंजारी, वीरेंद्र कटरे, एल.यू.खोब्रागडे, नूतन बांगरे, डी. टी.कावळे,हरिराम येळणे, महेंद्र सोनेवाने, कमलेश बिसेन, विनोद चौधरी (जि.प), अजय खरवडे यांचा समावेश जिल्हा कार्यकारीणीत करण्यात आला.त्याचप्रमाणे तालुकास्तरावर संघटन तयार करण्यासाठी आणि जिल्हा व तालुक्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तालुकासमन्वयक तयार करण्यात आले.त्यात सालेकसा तालुका अंतर्गत जी.सी.बघेले, राजकुमार बसोने, जयेश लिल्हारे देवरी तालुका अंतर्गत मोहन बिसेन, वीरेंद्र खोटेले, दीपक कापसे, प्रमोद निखाडे आमगाव तालुका अंतर्गत सुरेंद्र मेंढे, महेंद्र चव्हाण, डि.व्हि.बहेकार सडक अर्जुनी अंतर्गत ठाणेंद्र गोरेलाल तुरकर, वीरेंद्र भिवगडे, बाळू वालदे, गोंदिया तालुका अंतर्गत मोरेश्वर बडवाईक, प्रमोद बघेले, नरेंद्र गौतम, सुनील बावनकर, वाय. डी.पटले, अशोक तवाडे, गोरेगाव तालुका उमेश रहांगडाले, उत्तम टेंभरे, राजू भरणे, अर्जुनी मोरगाव तालुका दिलीप लोधी, रमेश संग्रामे, आशीष कापगते, कृष्णा कहालकर,तिरोडा तालुका एम.आर. पारधी, अशोक बिसेन, एस रहांगडाले आदी पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रा.बी.एम.करमकर,अशोक बोरकर, सावन कटरे, सावन डोये, खेमेंद्र कटरे, गुरुदास येडेवार, बी.आर.पटले ,भूमेश्वर चव्हाण ,शालिकराम मेंढे, रवी भांडारकर ,संतोष वैद्य, प्रकाश अगडे, कैलास भेलावे, मनोहर कटरे, किशोर बहेकार, राजकुमार चौधरी, गणेश चूटे, हेमंत बिसेन, विवेक निखाडे, पि.यू सिंगनजुडे , गुणीराम ठाकरे, सी.बी.बिसेन,अमित घावडे, शिशिर कटरे, सुनील भोंगाळे,विनायक येडेवार,महेंद्र बिसेन,श्री.बडवाईक यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

जनगणनेत ओबीसींना स्थान द्या, अन्यथा सहकार्य नाही

गडचिरोली,दि.09ः-भारत सरकारतर्फे जातीनिहाय जनगणनेला सुरूवात होणार आहे. परंतु यात ओबीसी प्रवर्गाचा समावेशच नसल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारतर्फे सुरू होणार्या जनगणनेमध्ये ओबीसींना स्थान देण्यात यावे अन्यथा ओबीसी समाज जनगणना प्रक्रियेसाठी सहकार्य करणार नाही असा ईशारा निवेदनातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान व केंद्रसरकारच्या गृहमंत्र्यांना देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देशात जातनिहाय जनगणनेला १८७२ पासून सुरूवात झाली. ती १९३१ पर्यंत दर दहा वर्षांनी नियमित सुरू होती. त्यानंतर मात्र ओबीसींची जनगणना झाली नाही. या देशात कुत्र्या-मांजरांची जनगणना
होते, मात्र ओबीसींची होत नाही.ओबीसींची जनगणनाच झाली नसल्यामुळे त्यांच्या विकासासाठी कोणतेही आर्थिक बजेट नाही. त्यामुळे त्या समाजाची प्रगती दिवसागणिक खुंटत
असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर,काँग्रेस ओबीसीसेल जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर,महासंघाचे पदाधिकारी दादुजी चौधरी,गोपीनाथ चांदेवार,प्रा.देवानंद कामडी,भाष्कर नरुले,मनोहर वाघ,प्रा.विनायक बांदुरकर,एस.टी.विधाते यांच्यासह इतर ओबीसीबांधव उपस्थित होते.

Thursday, 2 January 2020

निवडणुक कामाकरीता शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करा-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची मागणी

चंद्रपूर,दि.02 जानेवारीः- मतदार याद्या शुध्दीकरण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने दुर्गम भागातील जिवती तालुक्यातील शिक्षकांच्या नियुत्या रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
 यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिवती तालुक्यातील भौगोलिक स्थिती पाहता शिक्षकद्वारे चांगले काम होत असल्याचे मान्य करून प्रायोगिक तत्वावर प्रगणक म्हणून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कोणत्याही शिक्षकावर फौजदारी कारवाई होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त यांचा दौरा असल्यामुळे काम पूर्ण करण्यास सांगितले. गरज वाटल्यास काही दिवसांसाठी शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येईल,असे आश्वासन  जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच शिक्षकांवर कोणतीही कारवाई होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा शिक्षकांच्या मागणीबाबत विनंती करण्यात आली. सदर भेटीमध्ये सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ,राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्याम भाऊ लेडे, कालिदास येरगुडे, उमाजी कोडपे, तसेच संभाशिव गावंडे व शिक्षक बांधव उपस्थित होते.

चांद्रयान-३ सह गगनयान मोहिमेची घोषणा

8 इस्त्रोला केंद्राची परवानगी, सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित, 8 चार जणांची निवड, एकही महिला नाही

नवीदिल्ली.दि.02 (वृत्तसंस्था) - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी चांद्रयान-३ आणि गगनयान मोहिमेची घोषणा केली आहे. गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली. बेंगळुरुत के. सिवन यांनी पत्रकार परिषद घेत इस्रोच्या आगामी मोहिमा आणि योजनांबद्दल माहिती दिली. गगनयान २0२२ पयर्ंत अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.
गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. रशियामध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचे गठन करण्यात आले आहे. २0१९ मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे, अशी माहिती के. सिवन यांनी दिली आहे. याआधी के. सिवन यांनी या मोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश असेल अशी घोषणा केली होती. मात्र निवड झालेल्या अंतराळवीरांमध्ये महिलेचा समावेश नाही. २0२२ पयर्ंत गगनयान अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा निर्धार आहे. या मोहिमेअंतर्गत चारही अंतराळवीरांना सात दिवसांसासाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम इंडियन ह्युमन स्पेसफाइट प्रोगामचा भाग आहे. गगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असून, अंतराळवीरांचे प्रशिक्षण यावर्षींची सर्वात मोठी घडामोड असणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.
तुतुकुडीमध्ये उभे राहणार देशातील दुसरे स्पेस पोर्ट
के. सिवन यांनी देशात उभ्या राहणार्‍या दुसर्‍या स्पेस पोर्टबद्दलही यावेळी माहिती दिली. 'स्पेस पोर्टसाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे स्पेस पोर्ट तामिळनाडू येथील तुतुकुडी येथे उभारण्यात येणार आहे. आगामी काळात इस्रो मंगळ ग्रहापासून ते शनी ग्रहापयर्ंत अनेक महत्त्वाच्या मोहीमांवर काम करणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इस्रो रशियाची मदत घेणार आहे.'
चांद्रयान-३ ची घोषणा
इस्त्रो २0२0 मध्ये गगनयानसोबत चांद्रयान-३ मोहीम लॉन्च करणार आहे. चांद्रयान-३ मोहिमेसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचं के सिवन यांनी सांगितले आहे. 'चांद्रयान-३ मोहीम याचवर्षी लॉन्च केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. चांद्रयान-३ मोहीमेत आणि चांद्रयान-२ मध्ये बरंच साम्य आहे. मोहिमेवर काम सुरु झाले आहे. याचे कॉन्फिगरेशन चांद्रयान-२ प्रमाणेच असेल. यातही लँडर आणि रोव्हर असणार आहे', अशी माहिती के सिवन यांनी दिली आहे.चांद्रयान-२ चा ऑर्बिटर सक्रिय
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची फक्त भारतात नाही तर जगभरात चर्चा झाली होती. जगाने भारताच्या या ऐतिहासिक मोहिमेची दखल घेतली होती. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक 'विक्रम लँडर'चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. यासंबंधी बोलताना के. सिवन यांनी सांगितले की, आम्ही यशस्वीपणे लँडिंग करू शकलो नसतो तरी ऑर्बिटर अद्यापही काम करत आहे. पुढील सात वर्ष हा ऑर्बिटर सक्रिय राहणार असून यामधून वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.

पहिला येऊनही वर्गाबाहेर बसविले- देवेंद्र फडणवीस



पालघर,दि.02 (वृत्तसंस्था) - विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेपासून वंचित राहाव्या लागलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते अजूनही धक्क्यात आहेत. त्यासाठी ते शिवसेनेला जबाबदार धरत असून प्रत्येक व्यासपीठावरून शिवसेनेवर तोफा डागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा याच मुद्यावरून सेनेवर टीका केली आहे. 'पहिला आलेल्या मुलाला वर्गाबाहेर बसवले गेले', अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
 पालघर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सरकारवर त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. 'जनतेने युतीला जनमत दिले होते, मात्र शिवसेनेने बेईमानी केली. सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का?, असा सवाल फडणवीस यांनी केला. 'वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आले', असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावरही फडणवीस यांनी टीका केली. 'शेतकर्‍यांना विनाअट, सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासनही दिले होते. मात्र, ते आश्‍वासन ठाकरे सरकारने पाळले नाही. महाविकास आघाडीने केवळ जनादेशाशीच प्रतारणा केली असे नाही तर शेतकरी आणि जनतेशीही प्रतारणा केली, असे फडणवीस म्हणाले.

५९२ तळीरामांवर कारवाई

नागपूर,दि.02 -  नववर्षाच्या स्वागतासाठी बहुतांश लोकांनी सेलिब्रेशनसाठी रात्रीचे प्लॅनिंग केले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने शहरात दमदार हजेरी लावल्याने सेलिब्रेशन करणाऱ्या बहुतांश लोकांचा हिरमोड झाला. रस्त्यांवर दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांसाठी पोलिसांनी बॅरीगेट्स आणि फिक्स प्वाइंट्स तयार करून कंबर कसली होती. मात्र, अचानक आलेल्या पावसाने दुचाकीस्वारांची रस्त्यावर एन्ट्रीला स्वयंस्फूर्त ब्रेक लागल्याने रात्री १२ वाजताच्या सुमारास रस्ते शुकशुकाट बघायला मिळाला. त्यामुळे शहरात फक्त ५९२ दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या लोकांवर पोलिसांनी यंदा कारवाई केली आहे.
मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज होती. तर दुसरीकडे पोलिसही कंबर कसून होते. वाहतुकीस कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, याची पूर्णपणे तयारी पोलिसांनी केली होती. मद्याच्या अंमलाखाली राहून कोणीही वाहन चालवू नये असा नियम असतानासुद्धा काही अतिउत्साही तरुण मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले. अशा ५९२ वाहनचालकांवर कारवाई करून पोलिसांनी त्यांची नशा उतरविली.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...