Thursday 2 January 2020

चांद्रयान-३ सह गगनयान मोहिमेची घोषणा

8 इस्त्रोला केंद्राची परवानगी, सहाशे कोटींचा खर्च अपेक्षित, 8 चार जणांची निवड, एकही महिला नाही

नवीदिल्ली.दि.02 (वृत्तसंस्था) - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी चांद्रयान-३ आणि गगनयान मोहिमेची घोषणा केली आहे. गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली. बेंगळुरुत के. सिवन यांनी पत्रकार परिषद घेत इस्रोच्या आगामी मोहिमा आणि योजनांबद्दल माहिती दिली. गगनयान २0२२ पयर्ंत अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.
गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. रशियामध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचे गठन करण्यात आले आहे. २0१९ मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे, अशी माहिती के. सिवन यांनी दिली आहे. याआधी के. सिवन यांनी या मोहिमेत महिला अंतराळवीराचा समावेश असेल अशी घोषणा केली होती. मात्र निवड झालेल्या अंतराळवीरांमध्ये महिलेचा समावेश नाही. २0२२ पयर्ंत गगनयान अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा निर्धार आहे. या मोहिमेअंतर्गत चारही अंतराळवीरांना सात दिवसांसासाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम इंडियन ह्युमन स्पेसफाइट प्रोगामचा भाग आहे. गगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असून, अंतराळवीरांचे प्रशिक्षण यावर्षींची सर्वात मोठी घडामोड असणार असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.
तुतुकुडीमध्ये उभे राहणार देशातील दुसरे स्पेस पोर्ट
के. सिवन यांनी देशात उभ्या राहणार्‍या दुसर्‍या स्पेस पोर्टबद्दलही यावेळी माहिती दिली. 'स्पेस पोर्टसाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे स्पेस पोर्ट तामिळनाडू येथील तुतुकुडी येथे उभारण्यात येणार आहे. आगामी काळात इस्रो मंगळ ग्रहापासून ते शनी ग्रहापयर्ंत अनेक महत्त्वाच्या मोहीमांवर काम करणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इस्रो रशियाची मदत घेणार आहे.'
चांद्रयान-३ ची घोषणा
इस्त्रो २0२0 मध्ये गगनयानसोबत चांद्रयान-३ मोहीम लॉन्च करणार आहे. चांद्रयान-३ मोहिमेसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचं के सिवन यांनी सांगितले आहे. 'चांद्रयान-३ मोहीम याचवर्षी लॉन्च केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. चांद्रयान-३ मोहीमेत आणि चांद्रयान-२ मध्ये बरंच साम्य आहे. मोहिमेवर काम सुरु झाले आहे. याचे कॉन्फिगरेशन चांद्रयान-२ प्रमाणेच असेल. यातही लँडर आणि रोव्हर असणार आहे', अशी माहिती के सिवन यांनी दिली आहे.चांद्रयान-२ चा ऑर्बिटर सक्रिय
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची फक्त भारतात नाही तर जगभरात चर्चा झाली होती. जगाने भारताच्या या ऐतिहासिक मोहिमेची दखल घेतली होती. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक 'विक्रम लँडर'चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. यासंबंधी बोलताना के. सिवन यांनी सांगितले की, आम्ही यशस्वीपणे लँडिंग करू शकलो नसतो तरी ऑर्बिटर अद्यापही काम करत आहे. पुढील सात वर्ष हा ऑर्बिटर सक्रिय राहणार असून यामधून वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...