Thursday 2 January 2020

पहिला येऊनही वर्गाबाहेर बसविले- देवेंद्र फडणवीस



पालघर,दि.02 (वृत्तसंस्था) - विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेपासून वंचित राहाव्या लागलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते अजूनही धक्क्यात आहेत. त्यासाठी ते शिवसेनेला जबाबदार धरत असून प्रत्येक व्यासपीठावरून शिवसेनेवर तोफा डागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा याच मुद्यावरून सेनेवर टीका केली आहे. 'पहिला आलेल्या मुलाला वर्गाबाहेर बसवले गेले', अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
 पालघर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या सरकारवर त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले. 'जनतेने युतीला जनमत दिले होते, मात्र शिवसेनेने बेईमानी केली. सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का?, असा सवाल फडणवीस यांनी केला. 'वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आले', असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावरही फडणवीस यांनी टीका केली. 'शेतकर्‍यांना विनाअट, सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासनही दिले होते. मात्र, ते आश्‍वासन ठाकरे सरकारने पाळले नाही. महाविकास आघाडीने केवळ जनादेशाशीच प्रतारणा केली असे नाही तर शेतकरी आणि जनतेशीही प्रतारणा केली, असे फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...