Wednesday 26 September 2018

सुवर्णकन्येचे बेला येथे स्वागत


भंडारा,दि.26 : जिल्ह्याची कन्या आणि बेला येथील रहिवासी मयुरी धनराज लुटे हिने दिल्लीत पार पडलेल्या एशियाई स्पर्धेत ट्रॅक सायकलींगमध्ये दोन सुवर्ण पदक पटकाविले. सोमवारी सायंकाळी तिचे बेला गावात आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील बेला येथील मयुरी लुटे सहभागी झाली होती. शहरी स्पर्धकांना मागे टाकत तिने या स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकाविले. सोमवारी दिल्लीहून नागपूरला विमानाने आणि तिथून ती एका वाहनाने बेला येथे दाखल झाली. आपल्या गावच्या सुवर्णकन्येचे स्वागत करण्यासाठी बेला गावकरी सज्ज होते. जिल्हा परिषद शाळेजवळ मयुरी पोहचताच ढोलताशाच्या गजरात तिचे जल्लोषात स्वागत करुन गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच पुजा ठवकर, गणेश ठवकर, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, यशवंत सोनकुसरे उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता निमजे व शिक्षकांनी तिचे स्वागत केले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, सरपंच पुजा ठवकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, धनराज साठवणे, प्रविण उदापुरे, जयश्री बोरकर, पांडुरंग खाटीक, ललीत बेंदरे, विश्वजित घरडे, दर्शन जोन्दे, संजु मते, उपसरपंच मंगला पुडके यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मयुरी लुटे, सुनिता लुटे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार उमेश मोहतुरे यांनी मानले. मयुरीने मिळविलेल्या या यशाने सर्व गावकºयांची मान उंचाविली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...