२७ नोव्हेंबरपासून लसीकरण
गोंदिया दि.१८.: गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला आजारावर नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होणार असून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरुकता व सुरक्षितता निर्माण करण्यासाठी या मोहिमेत पालकांनी, शिक्षकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
गोवर रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पी.बी.खंडाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, सर्वप्रकारच्या जिल्हास्तरीय व गाव पातळीवरील आढावा सभा तसेच कार्यशाळा घेवून आपण आपली जबाबदारी समजून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करुन व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसिध्दी करावी. समाजामध्ये या मोहिमेबाबत जागरुकता व सुरक्षीतता निर्माण करुन प्रत्येकाने आपल्या मुला-मुलींना दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. ही मोहिम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरुन जिल्ह्यातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
डॉ.दयानिधी म्हणाले, गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३,६०,०३५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. निश्चित लाभार्थीपैकी जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्या बालकांना लसीकरण करावयाचे आहे. मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर ४ ते ५ आठवड्याच्या कालावधीत मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. निर्धारित करण्यात आलेल्या एकूण लाभार्थीपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी असल्यामुळे आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व शाळांमध्ये पहिल्या २ ते ३ आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थीचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमीत लसीकरण सत्राच्या किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ.निमगडे म्हणाले, गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार असून मुख्यत: १५ वर्षाखालील मुलांना होतो. सन २०१६ च्या आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे जवळपास ४९२०० मुले संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. रुबेला या आजाराचा संसर्ग गर्भवती स्त्रीयांना झाला तर त्यामुळे अचानक गर्भपात किंवा जन्मजात दोष (अंधत्व,बहिरेपणा व हृदयविकृती) होऊ शकते. सध्या गोवर व रुबेला हे आजार बालकांच्या दृष्टीने सर्वात हानीकारक आजार आहे. याकरीता भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजपर्यंत २१ राज्यात हे लसीकरण झालेले असून ४० कोटी बालकांना लस देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील ६ कोटी ७ लाख बालकांना २७ नोव्हेंबरपासून लस देण्यात येणार असून त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्याला गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येणार असून ग्रामीण व नागरी भागामध्ये १०० टक्के लाभार्थ्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार पवनीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) एल.एम.मोहबंशी, लायन्स क्लबतर्फे प्रमोद गुळधे, खाजगी शाळा कार्यकारी समितीचे अध्यक्ष व्ही.डी.मेश्राम, नर्सींग स्कूलच्या प्रभारी श्रीमती शहारे, जागतिक आरोग्य संघटनेचे आरआरटी डॉ.एफ.ए.मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.डब्ल्यू.वंजारे, डॉ.शितल मोहने व डॉ.हर्षवर्धन मेश्राम उपस्थित होते. सभेचे संचालन जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहायक ए.एस.वंजारी यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment