Saturday 3 September 2016

बलात्कारानंतर यंत्रणेचाही पाशवी चेहरा उघड

उस्मानाबाद- अवघ्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक झाली असली तरी बलात्काराइतकाच सरकारी यंत्रणेचा पाशवी चेहरा उघड झाल्याने या तालुक्यातील एक गरीब मजूर कुटुंब हादरले आहे. बलात्काराला १९ दिवस उलटले आहेत आणि जखमा झालेल्या जागी जंतूसंसर्ग झाला आहे, मात्र केवळ पैसे नाहीत म्हणून या चिमुरडीवर उपचारही झालेले नाहीत. सरकारी यंत्रणेने या चिमुरडीला मदतीचा हात दिलेला नाहीच आणि राज्य महिला आयोगाला या आडगावातल्या प्रकारात लक्ष द्यायला वेळही मिळालेला नाही!
पंधरा दिवसांपासून जिथे चूल बंद आहे, तिथे मुलीवर उपचार कुठून करावा, या विचाराने मोलमजुरी करणारे आई-वडील नशिबालाच दोष देत आहेत. उपचारांबाबत सरकारी यंत्रणाही उदासीन आहे. त्यामुळे कोवळ्या वयात बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी या निरागस मुलीने कशाच्या आधारावर ‘निर्भया’ व्हायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेच्या तालुक्यातील एका गावात १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका थोराड मुलाने सहा वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग केला. सायंकाळी आई मोलमजुरी करून घरी आली तेव्हा पीडीत मुलगी आणि तिचा तीन वर्षांचा लहान भाऊ दोघेही टाहो फोडून रडत होते. दोन दिवसांवर झेंडावंदन आहे. बूट घेण्यासाठी रडारड करीत असतील म्हणून आईने दुर्लक्ष केले. लहान मुलाला सोबत घेऊन गावातील आठवडा बाजारातून मजुरीच्या पगारातून मिळालेल्या पशांतून दोन बूट जोड विकत घेतले. घरी परतत असताना तीन वर्षांच्या मुलाने दुपारी घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली. मुलीवर घडलेला प्रकार ऐकून आईला भोवळ आली. तडक तिने आरोपीचे घर गाठले. गावातील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक गोळा केले आणि घडला प्रकार सांगितला. गावपातळीवर नेहमीप्रमाणे आपसात मिटवामिटवी करण्याचे प्रयत्न झाले.
पीडीत मुलीचे सर्वाग थरथर कापत होते. दोन पायावर उभे राहण्याचे बळदेखील तिच्या अंगात उरले नव्हते. पोट दुखत असल्याने रडूनरडून डोळे सुजले होते. सुरुवातीला उपचारासाठी सोलापूर गाठले. मात्र पोलिसांत तक्रार दिल्याखेरीज उपचार करण्यास नकार मिळाल्याने गेल्या पावली मुलीचे आई-वडील परत फिरले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी देशभरात स्वातंत्र्यदिवस मोठय़ा धूमधडाक्यात साजरा होत असताना या मुलीच्या पोटात वेदना उसळल्या होत्या. सर्व प्रक्रिया पार पडायला पहाट झाली. नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आणि मंगळवार, १६ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता वैद्यकीय तपासणीनंतर मुलीवर उपचार सुरू झाले. तीन दिवस या कोवळ्या जिवाला शारीरिक वेदना सहन कराव्या लागल्या. आपल्याबरोबर काय झाले आहे, हे त्या मुलीला कळतदेखील नव्हते.
घटनेला आता १९ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मुलीचे वडील तुळजापूर शहरात हमाली करतात तर आई गावातच दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीला जाते. या मानसिक धक्क्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून दोघांचेही काम बंद आहे. गाठीला आलेले शे-पाचशे रुपये धावपळ आणि किरकोळ उपचारातच संपले. पीडीत मुलगी अचानक रात्रीतून दचकून उठते, जंतूसंसर्ग झाल्यामुळे होत असलेला त्रास अस आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...