नागपूर,दि.29 : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या अटल आरोग्य महाशिबिरात तपासणीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित या शिबिरात दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. विजय रामदास कांबळे (वय 45, रा. जगदीशनगर) असे या युवकाचे नाव आहे. महाशिबिरात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असताना त्यांच्यापर्यंत माहिती न पोहोचल्याने कुणीही त्याच्या मदतीसाठी येऊ शकले नाही.
विजयवर काही दिवसांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. एका कार्यकर्त्याच्या सांगण्यावरून तो शिबिरात तपासणीसाठी कॅथेटर लागलेल्या अवस्थेत आला होता. तपासणीसाठी आल्यानंतर तो एका खुर्चीत बसला. यावेळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या हृदयाची क्रिया मंदावली. तो जागेवर कोसळताच परिसरातील काही डॉक्टरांनी छातीवर दाब देऊन त्याची हृदयक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. पंधरा ते 20 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. शिबिराचे उद्घाटन करून मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर काहीच वेळात ही घटना घडली.
त्याला वाचविण्याची धडपड सुरू असताना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी फोन केला. एक रुग्णवाहिका आली, परंतु ती बंद पडली. बराच वेळ निघून गेल्यानंतर आलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिकेतून विजयला मेडिकलमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले. मात्र, मेडिकलच्या मेडिसिन कॅज्युअल्टीमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. घटनास्थळी किंवा वाटेतच विजयचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अटल आरोग्य महाशिबिरात राज्यभरातून हृदयरोगतज्ज्ञ आले. परंतु, कोणालाही या घटनेची खबरबात नव्हती. उपस्थित हृदयरोगतज्ज्ञांपर्यंत विजयच्या प्रकृतीची माहिती पोचली नाही. शिबिराच्या स्थळापासून जवळच मेडिट्रिना हॉस्पिटल आहे. तेथे त्याला का नेले नाही, अशीही चर्चा येथे होती.
No comments:
Post a Comment