राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारोप
श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन
मोझरी विकासासाठी ५८ कोटी निधी
अमरावती,दि.30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र व देशात मोठा समुदाय त्यांच्या विचारांवर चालतो. राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. राष्ट्रसंतांच्या विचारानेच राज्य सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी समारंभाच्या जाहीर कार्यक्रमात ग्रामगीता विचारपीठावरून व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
यावेळी गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सुब्बाराव, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार मितेश भांगडिया, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, गुरुदेव मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मी आज गुरुदेवांचा अनुयायी म्हणून आलो आहे, मुख्यमंत्री म्हणून नव्हे” या पुण्यभूमीतून राष्ट्रसंतांच्या विचाराची ऊर्जा निश्चितपणे प्राप्त होते. राष्ट्रसंतांचे विचार समाजपरिवर्तनाचे आणि समाजाला सुसंस्कारित करणारे आहेत. समाजपरिवर्तनाची ताकद त्यांच्या विचारात होती. त्यागी व संतांना वंदन करण्याची देशाची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेने इथल्या माणसांना केवळ भाविक, श्रद्धावान बनवले नाही, तर त्यांच्यात संकटाचा सामना करण्याची वृत्ती पेरली. राष्ट्रसंतांनी समाजात विजिगिषू वृत्ती, शौर्यवृत्तीचे बीजारोपण केले. त्यातून उर्जावान समाज तयार झाला. स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार व जातिभेदाला विरोध त्यांनी प्रखरपणे केला. देशावर संकट आले तेव्हा स्वत: पुढे येऊन कार्य केले. इंग्रजांच्या काळात देशबांधवांवर अत्याचार होत असताना त्यांनी त्याविरोध प्रखर लढा देऊन समाजाला एकजूट केले.
राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून विश्वरूपी दर्शन दिले, असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा ग्रामगीतेतून घेण्यात आली आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामविकासाचा शाश्वत मंत्र ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यकर्त्याला दिला. स्वराज्याला सुराज्यात परिवर्तित करायचे असतील, तर संस्कारित समाजच हे करू शकतो. तशी पिढी राष्ट्रसंतांनी घडवली. आमचे एक हजार गावांसाठीचे महाराष्ट्र सामाजिक ग्रामपरिवर्तन अभियान ही देखील ग्रामगीतेचीच शिकवण आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी प्रेरणा घ्यायला मी इथे आलो आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रसंतांनी विश्वात्मक विचार मांडला. त्यातून त्यांनी शेवटच्या माणसाचा देखील विचार केला. आनंद हा पैश्यांनी विकत घेता येत नाही. मनाच्या व वागणुकीच्या श्रीमंतीची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या भजनात, शब्दांत समाज उभा करण्याची प्रेरणा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव सेवा मंडळाच्या श्री गुरुदेव मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
मोझरी विकासासाठी निधीची कमतरता नाही
मोझरी विकास आराखड्यात 58 कोटी रुपये निधी मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. या निधीतून मोझरी येथे अनेक प्रकल्प उभे राहणार आहेत. त्याचप्रमाणे, इतर आवश्यक निधीसाठी तत्काळ प्रस्ताव द्यावा, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोझरीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष पुष्पाताई बोंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रकाश महाराज वाघ यांनी केली. उपस्थितांचे आभार गुरुदेव सेवा मंडळाच्या जनार्दनपंत बोथे यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यातून आलेले गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment