· पंधरवड्याला 28 मे पासून सुरुवात
· या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नागपूर, दि. 29 : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्टसमोर ठेवून जिल्हा परिषदेतर्फे 9 जूनपर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. या पंधरवड्यात शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांच्या घरी जाऊन अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेतल्या जाणार असून त्यांना अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी व झिंक गोळ्यांचा वापर कशा प्रकारे करायचा याचे प्रात्यक्षित घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे. त्याचवेळेस आरएस आणि झिंक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. ज्या घरामध्ये पाच वर्षाच्या आतील बालक आहे तेथे मोफत औषधोपचार केला जात असून याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.
हा कार्यक्रम जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. बालमृत्यू कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच यासंबंधी जनजागृती देखील करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात झिंक कोपरा तयार करण्यात आला आहे. सर्व प्राथमिक शाळा व निमशासकीय शाळांमध्ये स्वच्छतेबाबत आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य सहाय्यक,द्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये एकाही बालकाचा मृत्यू होणार नाही यासाठी सर्व सामाजिक संस्थेची मदत घेतली जात असून अतिसार पंधरवडा राबविण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महिला व बाल कल्याण विभाग तसेच शालेय विभाग यांचा सक्रीय सहभाग आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावर सर्व आरोग्य विभगातील अधिकारी व कर्मचारी, गाव पातळीवरील सर्व आशा, गटप्रवर्तकांना प्रशिक्षण
देण्यात आले आहे. पाच वर्षाखालील 1 लाख 32 हजार 58 लाभार्थी या योजनेचा लाभ 9 जूनपर्यंत घेणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment