Monday, 13 May 2019

वाळू व्यवसायावर उदरनिर्वाह चालविणार्‍या मजुरांचा मेळावा

तुमसर,दि.१३ः – तुमसर-मोहाडी तालुक्यात वाळूवर आधारित व्यवसाय करणारे व उपजिविका चालविणारे ट्रक, ट्रॅक्टर चालक, वाहक, मालक, मजूर, हमाल या सर्वांच्या समस्या ऐकूण घेण्यासाठी लवकरच तुमसर- मोहाडी तालुक्यात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.
शासन स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून एमआईडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देते. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण परिसरात उद्योगासाठी जागा घेणारे उद्योगच सुरू करीत नाहीत. त्यामुळे बेरोजगार रोजगारापासून वंचित आहेत. तालुक्यात वाळूवर आधारित व्यवसाय करणार्‍यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एका ट्रक आणि ट्रॅक्टरवर सहा कुटुंब व्यवसाय करून पोट भरतात. मागील एक वर्षापासून घाट लिलाव झाले नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर झाली आहे. परिणामी, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वाळूची चोरी करणे नाईलाज झाले आहे. शासकीय दराने शासकीय कामासाठी व निमशासकीय कामासाठी वाळू मिळत नसल्याने ठेकेदारही चोरीची वाळू वापरणे पसंत करीत आहेत. शासकीय दर ४५0 रुपये ब्रास असताना लिलावधारकांकडून ३ हजार रुपये ब्रास रेती विकली जात असल्याने नियमानुसार वाळू घेणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. तुमसर- मोहाडी तालुक्यातील वाळूघाट शासकीय दराने ग्रामपंचायतीला देण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, तोडगा निघालेला नाही. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची चोरी केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. वाळू व्यवसाय, वाळूवर आधारित व्यवसाय व वाळूचा वापर करणारे इत्यादींच्या भावना समजून घेण्यासाठी तुमसर- मोहाडी तालुक्यात लवकरच या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समक्ष विषय समजून घेतला जातील, अशी माहिती आ. चरण वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...