गोंदिया,दि.17 :- शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आढळलेल्या मुदतबाह्य औषधप्रकरणाच्या तपासासाठी जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता केलेल्या रुग्णालयाच्या पाहणीने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
चौकशी समितीच्या सदस्यांनी खरोखरच रुग्णालयात येऊन चौकशी अहवाल तयार केला आहे की नाही हे सुध्दा बघणे या भेटीमागचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.१५ मे रोजी सकाळी १० वाजता आकस्मिक भेट देवून वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयाचे निरिक्षण केल्याने एकच धावपळ उडाली होती. विशेष म्हणजे जेव्हा जिल्हाधिकारी बलकवडे या रुग्णालयात पोचल्या त्यावेळी मात्र मिळालेल्या माहितीनुसार फक्त 3 वैद्यकिय अधिकारी हजर होते.तर दररोज विदर्भ एक्सप्रेसने येऊन सेवा देणारे अधिकारी कर्मचारी मात्र गैरहजर होते असे बोलले जात आहे. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रूखमोडे, अधिक्षक डॉ.नंदकिशोर जायस्वाल व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी बलकवड यांनी निरिक्षणादरम्यान रूग्णालयातील पिण्याचे पाणी व स्वच्छतेचा संदर्भात रूग्णालय प्रशासनाला निर्देशही दिले. नुकतेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मुदतबाह्य औषधी व इंजे्नशमुळे चर्चेत आले होते. याप्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी बलकवडे यांनी चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. त्या समितीने रुग्णालयाची पाहणी करुन आपला अहवाल नुकताच सादर केलेला आहे.त्यानंतर या रुग्णालयाची अचानक पाहणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी वार्ड क्रमांक १ व २ व आईसीयुमध्ये जाऊन रूग्णाची तसेच त्यांच्या कुटूंबियाशी चर्चा करून माहितीघेतली तसेच परत मुदतबाह्य औषधी दिल्या जात तर नाही याची खात्री करून घेतली. सध्या उन्हाळयाचे दिवस असून उष्माघात तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भात रूग्णालय प्रशासनाला दिशानिर्देश दिले. तसेच स्वच्छतेकडे लक्ष देण्याचेही निर्देश दिले. सांडपाणी वाहुन जाणाऱ्या नालीचीही पाहणी केली व फुटलेल्या नाल्या दुरूस्त करून देण्यासाठी निर्देश दिले. सदर बोरवेल त्वरित सुरू करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी महोदयांनी दिले.
No comments:
Post a Comment