देवरीतील एका आदर्श विवाह सोहळ्यात स्वच्छता दूतांचा सत्कार
सुरेश भदाडे
सुरेश भदाडे
देवरी- भारतीय समाजातील सोळा संस्कारांपैकी विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. विवाह संस्कार म्हणजे आनंद सोहळा. मात्र, अलीकडे अवाढव्य खर्च करून डीजेच्या कर्कश आवाजावर बायाबापड्यांचे बेताल नाचणे,आतषबाजीने होणारे प्रदूषण, हुंड्याची अवास्तव मागणी आदींमुळे विवाह हा आनंददायी संस्कार न राहता मनोरंजन सोहळा झाला आहे. अशा पद्धतीने आदर्श समाज घडूच शकत नाही. विवाह संस्कार हा मनोरंजन सोहळा न करता अगदी साध्या पद्धतीने इतरांच्या आरोग्याचा विचार करून कमी खर्चात साजरा केल्यास तो आपला परिवार आणि समाजासाठी एक आदर्श असा आनंद सोहळा ठरू शकतो, असे प्रतिपादन मोझरीच्या गुरूदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय प्रबोधनकार हभप लक्ष्मणदास काळे महाराज यांनी देवरी येथे बोलताना केले.
ते देवरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते कुलदीप दयाराम लांजेवार यांच्या विवाह प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी राष्ट्रसंत विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक श्री ज्ञानेश्वरदादा रक्षक,राष्ट्रीय युवा कीर्तनकार प्रशांत ठाकरे, विजय वाहोकार गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीपप्रज्वलन करून श्री गुरुदेव पद्धतीने या विवाह संस्कार सोहळ्याला सुरवात करण्यात आली.पुढे बोलताना हभप काळे महाराज म्हणाले की, आपल्या समाजातील उपवर मुलींना आपला जोडीदार निवडताना दक्ष राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. वधू आणि वधूच्या पालकांनी आपल्या मुलीसाठी आदर्श मुलाची निवड करताना त्याची संपत्ती, गाडी-बंगला परिवाराची चिंता न करता एका निर्व्यसनी आणि आपल्या जबाबदारीचे भान ठेवणाऱ्या आणि इभ्रतीची शान राखण्यासाठी वचनबद्ध असणाèया सुयोग्य वराची निवड करावी.विवाहसंस्कार पार पाडताना अवाढव्य खर्च करून कर्जाचे डोंगर उभारणे वा संपत्तीचे नुकसान करण्याऐवजी या खर्चातून समाजोपयोगी कार्य करण्यावर भर दिल्यास यातून आदर्श राष्ट्रनिर्माण करण्याचे महान कार्य करावे, असेही काळे महाराज यांनी आपल्या प्रबोधनातून उपस्थितांचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी विवाह करताना मुलामुलींचे गुणदोष, कुंडलीमिलान,जन्मवेळ, बाह्य आकर्षण आणि पंचांग पाहणे टाळून त्यापेक्षा मुलाचे आरोग्य, चारित्र्य, निर्व्यसनता आणि कर्मनिष्ठा यावर भर दिल्यास त्या दोघांचे आयुष्य कधीही दुःखी तर होणार नाहीच, पण भावी आदर्श पिढी घडविण्यात मोठा हातभार लागेल, असे सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या मंगलाष्टकांच्या साक्षीने नवदाम्पत्यांची जीवनगाठ बांधली जाते, ती मंगलाष्टके ही त्या वधूवरांनी कळणारी आणि भावी जीवनात उपयोगी पडणाऱ्या माहितीने परिपूर्ण असली पाहिजे. अशा पद्धतीने विवाहसंस्कारांचे आयोजन करण्यातच बहुजन समाजाचे उत्कर्ष दडून असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्रशांत ठाकरे यांनी समाजप्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
दरम्यान, या विवाह संस्कार सोहळ्यात देवरी नगरपंचायतीच्या स्वच्छता दूतांचे मान्यवरांचे हस्ते ग्रामगीता देवून सत्कार करण्यात आला.उल्लेखनीय म्हणजे या विवाहसंस्कारामध्ये आहेर वा भेट वस्तूंऐवजी शैक्षणिक साहित्य व पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याचे वितरण चालू शैक्षणिक वर्षात करण्यात येणार असल्याचे वरपिता दयाराम लांजेवार यांनी बोलताना सांगितले.यावेळी शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वऱ्हाड्यांना सुद्धा वंदनीय राष्ट्रसंतांनी रचलेल्या सामुदायिक ध्यान व प्रार्थनेची पुस्तके नवदाम्पत्यांच्या हस्ते भेटस्वरूपात देण्यात आली.
No comments:
Post a Comment