Saturday 18 May 2019

वाडीचे भाजप नगराध्यक्ष लाच घेताना जाळ्यात

नागपूर,दि,१८ः- खासगी संस्थेच्या बिलाची रक्कम काढून देण्यासाठी २0 हजार रुपयांची लाच स्वीकारणारे वाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ आत्माराम झाडे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बिडीपेठ, छोटी खदान, नागपूर निवासी तक्रारदार हे एका सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था शासकीय कार्यालयांना विविध कामांसाठी मनुष्यबळ पुरविण्याचे काम करते. त्याचप्रमाणे शासकीय कंत्राट घेऊन संस्थेसाठी आर्थिक स्रोत निर्माण करते. या संस्थेला नगर परिषद वाडी येथे मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट मिळाले. मिळालेल्या कंत्राटाप्रमाणे तक्रारदाराने नगर परिषदेला कंत्राटी तत्त्वावर संस्थेमार्फत ३ स्थापत्य अभियंता पुरविले होते. त्यांचे डिसेंबर २0१८ ते मार्च २0१९ असे एकूण चार महिन्यांचे थकीत पगार झाडे याने काढून दिले. त्याच्या मोबदल्यास २४ हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती.
त्यांनी एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. अधिकार्‍यांनी मिळालेल्या तक्रारीची खात्री करून शुक्रवार १७ मे रोजी सापळा रचला. या कारवाईसाठी एसीबीने भंडार्‍यातील अधिकार्‍याची नेमणूक केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार झाडेकडे गेले. २४ हजार रुपये देऊ शकत नाही, असे तक्रारदराने म्हटले. यावर तडजोड होऊन २0 हजार रुपये देण्याचे ठरले. झाडेने २0 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध वाडी येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक (अतिरिक्त कार्यभार) श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात भंडारा येथील उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पोना सचिन हलमारे, अश्‍विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, पोलिस शिपाई सुनील हुकरे, चालक दिनेश धार्मिक, प्रभाकर बले, अमोर फिस्के यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
नगराध्यक्ष प्रेम झाडे सकाळी घरातून वॉर्डात जाण्यासाठी निघाले. तेव्हा खाडे नामक व्यक्तीने त्यांच्या हाती एक लिफाफा सोपविला. काही महत्त्वाचे कागद असतील म्हणून त्यांनी उत्सुकतेने लिफाफा उघडून बघितला. त्या ठिकाणी कागदाऐवजी २0 हजार रुपयांची रक्कम होती. काही समजण्यापूर्वीच बाहेर दबा धरून बसलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचार्‍यांनी पकडले. त्यानंतर त्यांना नागपूर स्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. इकडे दुसर्‍या दलाने संपूर्ण घराला ताब्यात घेऊन सकाळी ११ वाजेपासून घराची झाडाझडती घेणे सुरू केले. त्यांचा मूळ व्यवसाय, लॉन, इमारत, नगदी रोख, दागिने, स्थावर संपत्ती इत्यादींची माहिती गोळा केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...