Friday 1 May 2020

विधान परिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी,21 मे रोजी निवडणूक


मुंबई,दि.01. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच अखेर संपुष्टाता आला आहे. कारण विधान परिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी दिली आहे. 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानेच याबाबतची माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची सूचना निवडणूक आयोगाला करावी, असे पत्र गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. हे पत्र घेऊन गुरुवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर राज्यपालांना भेटले. त्यापाठोपाठ राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधान परिषद निवडणुकीची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी सूचना केली आहे.
निवडणूक कशासाठी?
राज्यपाल सदस्याच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली तरीही त्या आमदारकीची मुदत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे नव्याने नियुक्तीऐवजी रिक्त जागांसाठी निवडणूक घेऊनच मुख्यमंत्र्यांनी रीतसर विधिमंडळाचे सदस्य व्हावे, असा मतप्रवाह होता.
महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर.
11 मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
14 मे पर्यंत अर्ज माघारी घेता येणार.
21 मे रोजी मतदान
26 मे पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश
ज्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याबाबतची सुचना केली आहे त्या बाबत-
रिक्त झालेल्या जागा
भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १
निवृत्त झालेले सदस्यशिवसेना
१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)
भाजप
१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस
१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर
काँग्रेस
१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे)
पक्षीय बलाबल
भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३
*निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...