Wednesday 20 May 2020

होमिओपॅथी डॉक्टरांना न्याय द्या

६६ टक्के रिक्त जागांवर नियुक्त करण्याची मागणी
गोंदिया,दि.20 : राज्यातील आरोग्य सेवेतील जवळपास ६६ टक्के वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रचंड तणाव येत आहे. त्यातच एमबीबीएस झालेले डॉक्टर बंधपत्रीत म्हणून एक वर्ष सेवा देवून राजीनामा देत निघून जातात. राज्यातील होमिओपॅथी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांनी सीसीएम (मॉडर्न मेडिसिन) अभ्यासक्रम पूर्ण केला असताना देखील त्यांना शासकीय सेवेत न घेता त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना न्याय देत रिक्त जागांवर त्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र सर्व शाखीय होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. संजय देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
डॉ. संजय देशमुख यांनी राज्य शासनाला दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यात जवळपास ८० हजारपेक्षा जास्त होमिओपॅथी डॉक्टर आहेत. ते विविध जिल्ह्यात प्रॅक्टीस करत आहेत. त्यांनी बीएचएमएस उत्तीर्ण करून राज्य शासनाची आधुनिक वैद्यकीय शास्त्राची पदवी देखील घेतली. राज्य शासनाने सीसीएमपी झालेल्यांची नोंद महाराष्ट्र मेडिकल काऊन्सीलमध्ये करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. राज्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे असल्याने आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे. एमबीबीएस अधिकारी ग्रामीण भागात काम करत नाही. बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी एक वर्ष सेवा देवून राजीनामा देतात. ९० टक्के शासकीय रुग्णालयांत बीएएमएस झालेले डॉक्टर सेवा देत आहेत. बीएएमएस पदवी धारकांच्या अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्त्र हा अभ्यासक्रम नसून देखील त्यांना सेवेत घेण्यात येत आहेत. जेव्हा की ते सर्रास अ‍ॅलोपॅथीक औषधांचा वापर करतात. रिक्त जागा भरून आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता होमिओपॅथिक डॉक्टरांना सेवेत घेण्यात यावे. इतर पॅथीच्या डॉक्टरांना ज्या पद्धतीने कंत्राटी तत्वावर घेण्यात येते. त्यात तत्वावर होमिओपॅथी झालेल्यांना घेण्यात यावे. आयुष मंत्रालयाने देखील कोविड १९ उपचाराकरिता काढलेल्या जाहिरातीत देखील होमिओपॅथी डॉक्टरांना घेण्यात यावे, असे म्हटले असले तरी त्याकडे स्पष्ट दुर्लक्ष करण्यात आले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र होमिओपॅथी विभाग तयार करून होमिओपॅथी उत्तीर्ण झालेल्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. संजय देशमुख यांनी केली आहे. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...