Saturday 9 May 2020

मुदतबाह्य बियाणे व रिकाम्या पिशव्या आढळल्या; दोन कृषी केंद्रांना नोटीस

गोंदिया दि ९ ::जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम – 2020 मध्ये चांगल्या दर्जाचे बियाणे मिळाले पाहिजे यासाठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी आणि बियाणे नमुने काढण्यासाठी बियाणे निरीक्षकांमार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत एका ठिकाणी मुदतबाह्य धान बियाणे साठा व दुसऱ्या ठिकाणी एका कंपनीच्या शेकडो रिकाम्या पिशव्या आढळल्यामुळे संबंधित कृषी केंद्र संचालकांना नोटीस देण्यात आली आहे.
गोंदिया येथील मुक्ता कृषी केंद्र यांच्या आंभोरा येथे असलेल्या गोदामाची आज ९ मे रोजी तपासणी करण्यात आली.या तपासणीदरम्यान ७१० किलो मुदतबाह्य धान बियाण्यांचा साठा आढळून आल्यामुळे सदर बियाण्यांची विक्री करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले. बियाणे निरीक्षकांच्या उपस्थितीत या साठ्याची विल्हेवाट लावण्याचे संबंधितांना सूचित करण्यात आले.
गोंदिया येथील गोरक्षण मार्केटमधील कमल कृषी केंद्राच्या सर्कस ग्राउंड येथे असलेल्या गोदामाला भेट देऊन तपासणी केली असता जिवालॉजिक्स या बियाणे कंपनीच्या रिकाम्या ३८४ पिशव्या आढळून आल्या. ह्या पिशव्या अनुचित प्रयोजनासाठी गोदामात ठेवण्यात आल्याचे दिसून आल्याने तेथेच पंचनामा करून सर्व पिशव्या ताब्यात घेण्यात आल्या आहे. संबंधित कृषी केंद्र संचालकांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
बियाणे व खते विक्री संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...