
देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याने देशातील विविध राज्यात राजकीय पक्षातील नेते आणि काही नामवंत व्यक्तींकडून दारु सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात दारुची दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान वाईन शॉप्स& सुरु करून राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे, अशी सूचना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. राज ठाकरेंच्या या सूचनांवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अवैध दारुविक्री सुरु असल्याचे मान्य केले होते. राज्याला पैशांची गरज आहे हे 100 टक्के आहे. त्यात काहीच शंका नाही. या परिस्थितीमध्ये महसूल कसा उभा करायचा याचा विचार करावा लागेल. दारू बंद केल्यानं दारू बंद आहे असं नाही. कारण काळाबाजार सुरु झालेला दिसतो, थोरातांनी सांगितलं होतं. आता, राजस्थानमधील आमदार भरतसिंह कुन्दनपूर यांनी सविस्तरपणे पत्र लिहून राज्यात दारु सुरु करण्याची मागणी केली. अवैध आणि घावटी दारु विक्रीचं प्रमाण वाढलं असून ते पिणाऱ्यांना शारिरीक त्रास होत आहे. ३० एप्रिल रोजीच्या एका बातमीचा संदर्भ देत, घावटी दारु पिल्याने दोघांना अंधत्व आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, अवैध दारुविक्री सुरु असून राज्यात महसूल तुट भरुन काढण्यासाठी दारुची दुकाने सुरु करावी असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, जर कोरोना व्हायरस हातावर दारु टाकल्यानंतर निघून जातो, तर पिणाऱ्यांच्या घशातून तो व्हायरस साफ होईल, तो व्हायरल नष्ट होईल, असे धक्कादायक विधान या आमदारांनी केले आहे.
No comments:
Post a Comment