Thursday 7 May 2020

जास्तीत जास्त 30 जणांच्या उपस्थितीत पार पडणार शुभमंगल

गोंदिया दि.8 (जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांना यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने लग्नसमारंभासाठी परवानगी देण्याकरिता उपविभागीय अधिकारी तथा ज्या तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय नाही त्या तालुक्यात संबंधित तहसीलदार हे प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
प्राधिकृत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील लग्न समारंभाबाबत परवानगी देतांना वर आणि वधू पक्षाकडील एकूण जास्तीत जास्त 30 व्यक्ती लग्नसमारंभाला एकत्रितपणे उपस्थित राहतील. तेही शारीरिक अंतर ठेवून. त्यापेक्षा जास्त नागरिक लग्न समारंभाला उपस्थित राहणार नाही तसेच इतर काळजी घेण्याबाबत आवश्यक अटी व शर्ती नमूद करून लग्न समारंभास परवानगी देण्यात येणार आहे.
वर आणि वधूच्या दोन्ही पक्षांना त्यांच्या क्षेत्रनिहाय संबंधित तहसील कार्यालय/ उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.वर-वधू जर एकाच क्षेत्रांतर्गत येत असतील तर दोन्ही पक्षांना तहसील कार्यालय /उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.वर-वधू या दोन्ही पक्षाकडून लग्नसमारंभात जास्तीत जास्त 30 नागरिकांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार नाही. परवानगी देताना संबंधित दोन्ही तालुक्यातील तहसीलदार/ उपविभागीय अधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा.
लग्न समारंभाची परवानगी/वाहन परवानगी तसेच इतर आवश्यक परवानगी व पासेस संबंधित परवानगी तहसीलदार/ उपविभागीय अधिकारी यांनी द्याव्यात. परवानगीबाबत दिलेल्या अटी व शर्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. लग्नसमारंभाच्या परवानगीबाबतचा आदेश गोंदिया जिल्ह्यापुरताच मर्यादित असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आदेशात म्हटले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...