Friday 15 May 2020

गोंदिया जिल्ह्यात सीलबंद बाटलीतून होणार घरपोच मद्य विक्रीची सेवा



कंटेनमेंट झोन वगळून विक्री देशी मद्य घरपोच विक्रीला परवानगी नाही छापील किंमतीने विक्री करणे बंधनकारक

गोंदिया दि.15 : राज्य शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये घरपोच सीलबंद बाटलीतुन मद्यविक्री करण्याचे आदेश 11 मे रोजी दिले आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी 14 मे 2020 रोजी काढलेल्या एका आदेशाने गोंदिया जिल्ह्यात देखील सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये स्पिरिट, सौम्य मद्य, बियर व वाईनची सीलबंद बाटलीतून घरपोच विक्री करता येणार आहे
जिल्ह्यामध्ये घरपोच मद्य विक्री सेवा ही जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतरत्र करता येणार आहे. वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये घरपोच मद्यविक्री सेवा देता येणार नाही. देशी मद्याची घरपोच सेवा देता येणार नाही. ग्राहकाकडे परवाना नसल्यास त्यास नमुना एफएल-एक्स-सी परवाना अनुज्ञप्तीधारक देतील. सदर परवाना https://stateexcise.maharashtra.gov.in किंवा https://exciseservices.mahaonline.gov.in यावर तात्काळ उपलब्ध होईल. मद्याची मागणी नोंदविण्यासाठी परवानाधारक – ग्राहक व्हॉट्सॲप/ लघुसंदेश/ भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनीचा वापर करून मागणी करता येईल. किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाने त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक ठळकपणे त्याच्या दुकानाबाहेर प्रदर्शित करावा. या माध्यमांचा वापर करून घरपोच मद्य विक्री सुविधा देण्याची कार्यवाही अनुज्ञप्तीधारकांनी करावी. घरपोच मद्य वितरण व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळ संबंधित दुकानदाराने  ठेवावे. डिलिव्हरी बॉयला कोणत्याही परिस्थितीत २४ युनिटपेक्षा जास्त मद्याची वाहतूक करता येणार नाही. आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत दुकानातून मद्य वितरित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अनुज्ञप्तीधारक घरपोच मद्यसेवा किंवा त्यांची वितरण व्यवस्था चोख करण्यास जबाबदार असेल. मद्याची घरपोच सेवा देतांना मद्य विक्री छापील किरकोळ किमतीनेच करणे बंधनकारक आहे. घरपोच मद्य सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये. घरपोच मद्याची सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयची नोंदणीकृत डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र त्याने सोबत बाळगणे आवश्यक आहे. डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, हेड कॅप आणि हॅन्डग्लोज वापरणे तसेच त्याने निर्जंतुकीकरणासाठी सॅनीटायझरचा वापर करणे, वेळोवेळी थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक आहे.
मद्य वितरण सेवेमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीला आरोग्य सेतू ॲप्सचा वापर कसा करावा याबाबतचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची राहील. घरपोच मद्य विक्रीसाठी अनुज्ञप्तीधारकाने एक अतिरिक्त स्वतंत्र नोंदवही ठेवावी.
मद्य बाळगणे, वाहतूक करणे ईत्यादी मद्यसेवन परवान्यातील तरतुदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता अनुज्ञप्तीधारकांनी घ्यावी. घरपोच मद्य सेवेच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारक व दोषीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५, साथरोग प्रतिबंध कायदा, भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...