गडचिरोली पोलिसांची कारवाई
गडचिरोली-गेल्या कित्येक दिवसापासून पोलिसांना हव्या असलेल्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य आणि वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का ऊर्फ नर्मदा दीदी आणि तिचा पती राणी सत्थ्यनारायण ऊर्फ किरण ऊर्फ किरणदादा हे दांपत्य अखेर गडचिरोली पोलिसांच्या सापळ्यात अडकले. या दोघांना पोलिसांनी गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा बसस्थानकावर अटक केली.
सविस्तर असे की नर्मदाक्का आणि किरण हे दोघे नक्षली दांपत्य अनेक नक्षली घातपातातील गुन्ह्यात सहभागी असल्याने ते तेलंगानासह गडचिरोली पोलिसांना हवे होते.नर्मदाक्का (वय 58), राहणार कोडापावनुरू, गलावरम मंडल जिल्हा कृष्णा (आंध्रप्रदेश) आणि तिचा पती किरण (वय 70) राहणार नरेंद्रपुरम, अमलापुरम जवळ, राजानगरम मंडल,जिल्हा पूर्व गोदावरी (आंध्रप्रदेश) हे दोघेही तेलंगाना राज्यातून सिरोंचा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती तेलंगाना आणि गडचिरोली पोलिसांच्या हाती लागली. मिळालेल्या माहितीवरून तेलंगाना पोलिसांच्या सहकार्याने गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा बसस्थानकात सापळा लावून या दोन्ही जहाल नक्षलवाद्यांना अटक केली.
नर्मदाक्का हिचा नक्षलवाद्यांनी पोलिसांविरुद्ध घडवून आणलेल्या अनेक गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता. 1 मे 2019 रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत मौजा जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोली पोलिस दलाचे 15 जवान आणि 1 खासगी वाहनचालक शहीद झाले होते. या हत्याकांडाच्या नियोजनात नर्मदाक्का व तिचा पती किरण यांची प्रमुख भूमिका होती. उल्लेखनीय म्हणजे नर्मदाक्काच्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात एकूण 65 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर किरण हा दंडकारण्य पब्लिकेशन टिमचा प्रमुख आहे. याशिवाय नक्षलवाद्यांच्या प्रभात मासिकाचा तो प्रमुख आहे. या नक्षली दांपत्याच्या अटकेमुळे गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
No comments:
Post a Comment