Wednesday 19 June 2019

अघोरी पूजा करणार्‍या भोंदूबाबाला अटक


भंडारा ,दि.18ः-उच्चशिक्षित मुलीला खुद्द तिच्या मैत्रिणीनेच भावनेत अडकवून तिच्या मृत आईशी बोलणी घालून देतो म्हणून भोंदूबाबाकरवी अघोरी पूजा करण्यास सांगितले. मुलीला याबाबत शंका येताच तिने पोलिसांना माहिती दिली. अघोरी पूजा करताना भोंदूबाबा व तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली. ही पूजा करण्यासाठी भोंदूबाबाने ३१ हजारांची मागणी केली होती. दोन्ही आरोपींना २0 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पवनी येथील आरोपी तरूणी अंकीता (१९) (काल्पनिक नाव) हिने शिकवणी वर्गात मैत्री झालेल्या संगीता (१९) (काल्पनिक नाव) रा. पवनी हिला भावनेत अडकवून ‘तुझी आई मरण पावली आहे. तिला करणी करून मारण्यात आले होते. तुझ्या भावाला सुद्धा अशाच रितीने मारल्या जाणार आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर तुला एक पूजा करावी लागेल. ही पूजा करण्यासाठी माझ्या ओळखीचा जितू अनिल मेर्शाम रा. राजनांदगाव नावाचा महाराज आहे. तु त्याचेकडून पूजा करून स्वत:चे जीवन व भावाचे जीवन वाचव’, अशी बतावणी करून मी सांगत असलेले खोटे वाटत असेल तर पूजा करून तुझ्या मृत आईला तुझ्याची प्रत्यक्ष बोलायला लावण्यास महाराज सक्षम असल्याचे सांगितले.
संगिताने शिकवणी वर्गातील अन्य मैत्रिणींकडून अंकिताबाबत अधिक माहिती घेतली असता ती अशाच रितीने भावनेत अडकवून जादूटोण्याच्या नावाखाली फसवून आर्थिक लुटमार करीत असल्याचे माहित झाले. संगिताने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून त्यांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना माहिती दिली. पवनी पोलिसांनी सापळा रचून गोसेखुर्द धरणाच्या नहरावर खापरी जंगल शिवारात अघोरी पूजा करताना भोंदूबाबा जितू अनिल मेर्शाम व अंकीता यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पुजेचे साहित्य, घुबडाचे पाय, हडीची माळ, कोंबडा, देशी दारूची बॉटल, हवनाचे साहित्य आदी जप्त करून जादुटोणा प्रतिबंधक कायदा २0१३ चे कलम ३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.सदर कारवाई पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलिस उपनिरीक्षक पागारे, पोलिस हवालदार भरत ढाकणे, संतोष चव्हाण, किशोर देशमुख, सचिन खराबे, कळपते यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...