सरपंच चंद्रकला कावळेंसह गावकऱ्यांचा आरोप
बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच विहीर कलंडली
देवरी,दि.12- आदिवासी, नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील विकास कामांचा दर्जा काय असतो, याची पुन्हा एकदा प्रचिती तालुक्यातील पालांदूर (जमीदारी) येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारावरून आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गावात उभारण्यात येणारी पूरक पाणी पुरवठा योजना पहिल्याच टप्प्यात विहीर बांधकामासाठी अभियंत्यांनी चुकीची जागा निवडल्याने धोक्यात आल्याचा आरोप सरपंच चंद्रकला शामराव कावळे यांचेसह सदस्य आणि गावकऱ्यांनी केली आहे. या चुकीच्या बांधकामाला जबाबदार अभियंत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पालांदूरवासियांनी प्रशासनाकडे केली आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पालांदूर, गरारटोला आणि टेकरी या गावातील साडेतीन हजार लोकवस्तीला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेने सन 2017-18 या वर्षात 1 कोटी, 4 लाख, 30 हजार 175 रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या चुंभली नदीच्या तीरावर जागेचे नियोजन ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग देवरीच्या अभियंत्यांनी केले. या सहा मीटर व्यासाची आणि 15 मीटर खोल विहीर तयार करण्याच्या कामाला मे2017 मध्ये प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. सुमारे 30-35 फूट खोल विहिरीचे बांधकाम करून पावसाळ्यामुळे काम थांबविण्यात आले. दरम्यान, थांबलेले बांधकामास यावर्षी पुन्हा सुरवात करताच ही विहीर नदीच्या पात्राच्या दिशेने कलंडली. यामुळे सदर विहिरीच्या काँक्रिट भिंतीला तडे केले. सदर प्रकार लपविण्यासाठी अभियंत्यांच्या सूचनेनुसार घाईगडबडीत विहिरीलगतच पात्रातील मातीचा जेसीबीच्या साहाय्याने उपसा करून विहीरीभोवती भरणा भरण्यात आले. परिणामी, विहिरीजवळील पात्राकडील मातीची पकड आणखी सैल झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण विहीर कोलमडण्याची भीती ग्रामपंचायत कार्यकारिणीसह गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अद्यापही अपूर्ण असलेल्या या विहिरीच्या बांधकामावर आतापर्यंत 19 लाख, 93 हजार 786 रुपये खर्च झाल्याचे कार्यकारिणी सदस्यांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे कंत्राटदाराने या विहिरीशेजारीच दुसरी छोटी विहीर तयार केली, त्या विहिरीला मूळ विहीरीपेक्षा पाण्याचा साठा अधिक असल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी सांगितले. याविषयी ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह देवरीचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे. उल्लेखनीय म्हणजे या कामाच्या पाहणीसाठी आलेल्या अभियंत्यांनी कार्यकारिणीच्या सदस्यांना कलंडलेली विहीर ही दोराच्या साहाय्याने ओढून सरळ करून देण्याचे आश्वासन दिल्याचे कार्यकारिणी सदस्य सांगतात, हे विशेष. या विषयी सरपंच कावळे, उपसरपंच मूलचंद नाईक, सदस्य श्रीराम राऊत, प्रल्हाद चौधरी, उत्तरा वळगाये लता राऊत यांनी या सदोष बांधकाम करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करून खर्च झालेला निधी वसूल करण्याची मागणी केली आहे.
याविषयी देवरीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला भेट दिली असता संबंधित अभियंता आणि उपविभागीय अभियंता कार्यालयात हजर नव्हते. उपअभियंता एस.व्ही.पवार यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्याचे मान्य करून गावकऱ्यांना तांत्रिक बाबी खुलासेवार समजावून सांगितल्याचे आणि तक्रारीला लेखी उत्तर दिल्याचे सांगितले. मात्र, असे कोणतेही लेखी उत्तर ग्रामपंचायतीला मिळाले नसल्याचे सरपंच कावळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
No comments:
Post a Comment