नवी दिल्ली.दि.24: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2017 मध्ये आचार्य आरबीआयच्या सेवेत दाखल झालेले आचार्य यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे. त्याआधी डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता.
विरल आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीमचे महत्त्वाचे घटक होते. मात्र, त्यांनीही पटेल यांच्या प्रमाणेच कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला. 23 जानेवारी 2017 रोजी आचार्य आरबीआयच्या सेवेत रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर सरकारने शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती केली. मात्र दास आणि विरल यांच्या मतांमध्ये बरंच अंतर होतं. पतधोरण निश्चित करण्यासाठी झालेल्या मागील दोन बैठकांमध्ये महागाई आणि विकास दर या मुद्द्यांवरुन दोघांचे मतभेद समोर आले होते. नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत वाढत्या महसुली तुटीवरुन आचार्य यांनी मांडलेली मतं दास यांच्यापेक्षा वेगळी होती.
आरबीआयचे वरिष्ठ डेप्युटी गव्हर्नर एन. विश्वनाथन यांचा कार्यकाळदेखील लवकरच संपणार आहे. मात्र आचार्य यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता राखणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी गेल्या वर्षी व्यक्त केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
No comments:
Post a Comment