
बातमीदाराने कौर यांना फोनवर लाईव्ह सांगितले, की अपघातात पाच जखमी झाले होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झालेला आहे. ज्या क्षणी बातमीदार ही माहिती सांगत होता, त्या क्षणी कौर यांना समजून चुकले की गाडीचा तपशील आणि अपघातातील इतर तपशील त्यांच्या पतीच्या प्रवासाशी संबंधित आहेत. अन्य चौघांसह डस्टर मोटारीतून त्यांचे पती त्या दिवशी त्याच काळात महासमुंडमध्ये प्रवास करीत होते.
बातमी सुरू असताना कौर यांनी आपल्या भावना अतिशय नियंत्रित ठेवल्या. बातमीपत्र संपताच कौर उन्मळून गेल्या. 'सुप्रित अतिशय शूर स्त्री आहे. न्यूज अँकर म्हणून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आज जे काही घडले, त्याचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे,' असे कौर यांच्या एका सहकाऱयाने 'हिंदुस्थान टाईम्स' या वृत्तपत्राला सांगितले. कौर या गेली नऊ वर्षे आयबीसी-24 वाहिनीसाठी न्यूज अँकरचे काम करीत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा हर्षद कावडे यांच्याशी लग्न झाले होते. मुळच्या भिलाईच्या कौर सहकुटुंब रायपूरला राहतात.
बातमीपत्र संपल्यानंतर तत्काळ कौर अपघातस्थळी रवाना झाल्या. 'बातमीचा तपशील समजत गेला, तस तसे कौर यांना आपला नवरा गेला असल्याचे जाणवले. मात्र, त्यांनी बातमीपत्र पूर्ण केले. त्यानंतर त्या स्टुडिओतून बाहेर आल्या आणि नातेवाईकांना फोन करू लागल्या,' असे चॅनेलच्या एका वरीष्ठ संपादकाने सांगितले. बातमीपत्र चॅनेलवरून दाखवले जात असताना कौर यांच्या सहकाऱयांना अपघाताची कल्पना आली होती. '...पण आम्ही तिला सांगू शकत नव्हतो. नवरा गेला तुझा, हे तिला कसे सांगायचे याची भीती वाटत होती...', असे आणखी एका सहकाऱयाने सांगितले.
No comments:
Post a Comment