Tuesday 18 April 2017

अटकेनंतर लगेच विजय माल्याची सुटका

लंडन, ता. 18 - हजारो कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी भारताला हव्या असलेल्या  किंगफिशर एअरलाइन्सच्या विजय माल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र त्याला लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. माल्याकडे भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींचे कर्ज थकित आहे. तसेच त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गंभीर स्वरूपाचे आर्थिक गुन्हे दाखल झालेले आहेत.  
माल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडून अटक केली. अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याच्या भारताकडे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण माल्याला वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले असता तेथे कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. त्यानंतर  'माझ्या अटकेचे भारतातील प्रसारमाध्यमांनी अवास्तव वृत्तांकन केले. प्रत्यार्पणाच्या खटल्याची आज सुनावणी सुरू झाली आहे,' असे ट्विट करत माल्याने प्रसारमाध्यमांवर टीका केली.  
माल्याच्या प्रत्यार्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयाने 9 फेब्रुवारी रोजी ब्रिटिश सरकारला प्रस्ताव पाठवला होता. 'माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयकडून आलेला प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे सोपवण्यात आला आहे. माल्याविरोधात भारतात खटला चालवण्यासाठी त्याला भारताकडे सोपवण्यात यावे', अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी केली होती.

विजय माल्याची बुडीत निघालेली कंपनी किंगफिशर एअरलाइन्सकडे नऊ हजार कोटींचे कर्ज थकले होते. एसबीआयच्या नेतृत्वाखालील 17 विविध बँकांनी माल्याला हे कर्ज दिले होते. कंपनी डबघाईस येऊन कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्यावर माल्या इंग्लंडमध्ये पसार झाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने माल्याला पासपोर्टसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र माल्या न्यायालयात हजर राहिला नव्हता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...