Tuesday 25 April 2017

शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा डोळा निकामी

भंडारा,दि.25: कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षीय बालकाला शिक्षिकेने पेन फेकून मारली. ही पेन उजव्या डोळ्याला लागल्याने तो निकामी झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील जांब येथील सेंट जॉन कॉन्व्हेंटमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा न नोंदविता आरोपीला अभय दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
ओम बादल श्रीपात्रे असे जखमी बालकाचे नाव आहे. ही घटना ७ एप्रिलला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडल्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पालकांनी म्हटले आहे. बादल श्रीपात्रे यांचा ओम हा पाच वर्षीय मुलगा नित्याप्रमाणे ७ एप्रिलला शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर ओमची आई रजनी ही त्याला घ्यायला शाळेत गेली होती. यावेळी त्याच्या उजव्या डोळ्याला जखमी दिसून आल्याने तिने शिक्षिका शीतल जावळकर यांना विचारणा केली. यावर तिने उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप रजनी श्रीपात्रे यांनी केला आहे.
डोळ्याची दुखापत असल्याने पालकांनी ओमला तातडीने शीतल जावळकर व तिच्या पतीसह भंडाऱ्याला आणले. येथील डॉक्टरांनी त्याला नागपुरला उपचारासाठी नेल्याचा सल्ला दिला. यावेळी शीतल जावळकरचे पती हे स्वत: विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत नागपुरला गेले. तिथे महात्म्ये रुग्णालयात ओमच्या डोळ्याची तपासणी केली असता तेथील डॉक्टरांनी डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करावी लागेल व याकरिता एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. यानंतर शिक्षिका जावळकर यांचे पती यांनी नागपूर येथे ओम व त्याच्या पालकांना सोडून गाव गाठले व त्यानंतर त्यांनी याप्रकरणात कुठलीही मदत करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी ओमच्या पालकांनी आंधळगाव पोलिसात शिक्षिका शीतल जावळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिल्याचा आरोप ओमचे आईवडील बादल व रजनी श्रीपात्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...