Tuesday 18 April 2017

'गृह' खाते आवडीचे -पंकजा मुंडे


pankaja
मुंबई- मंत्रिमंडळातील गृहखातं आपल्या आवडचं खातं आहे, असे विधान राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्याने मुख्यमंत्र्यांविरोधातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

पंकजा मुंडे माजलगावमधील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस निवासस्थानाच्या उद्घाटनावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करत असताना त्या गृहखातं आवडतं खातं असल्याचे बोलल्या. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर  ग्रामविकास खाते सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिली नव्हती. मात्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शर्यतीत असलेल्या पक्षातील स्पर्धकाचे अप्रत्यक्ष पंख कापले होते. त्यामुळे एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्या सारख्या नेत्यांना जागेवर स्थिर ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यांना सध्या तरी यश आलेले आहे. 'चिक्की घोटाळयाचा' आरोप झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्न झाला होता. परंतू गोपीनाथ मुंडे यांचा वारस म्हणून पंकजा मुंडेंची ओळख निर्माण झाल्याने मुख्यमंत्र्यांपुढे कोणताही निर्णय घेणे अवघड होऊन बसलेले आहे. त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याबाबत पंकजा मुंडे यांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टोला लागावण्याचा प्रयत्न केला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.      
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत हुशारीने गृह खाते स्वताःकडे ठेवले आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात मुख्यमंत्री पदावरील व्यक्तिने गृहमंत्री पद स्वताःकडे ठेवलेले नव्हते. इतकेच नव्हे तर शिवसेना-भाजप युतीच्या काळात सेनेचा मुख्यमंत्री होता परंतू गृहमंत्रीपद भाजपाच्या वाट्याला होते. गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या खात्याचा समर्थपणे कारभार करत भाजपाचा महाराष्ट्रामध्ये दबदबा निर्माण करण्यात यश मिळवले होते. त्यामुळे वारसा हक्काने पंकजा यांनी गृहखात्याबाबत इच्छा व्यक्त करुन मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलसंधारण खाते पंकजा मुंडे यांच्या कडून राम शिंदे यांना दिले होते. त्यावेळी पंकजा नाराज झाल्या होत्या. मुख्यमंत्री पदावर असेपर्यंत गृह खाते स्वताःकडे ठेवणार असे फडणवीस यांनी खाजगीत बोलताना सांगितले आहे. त्यामुळे पंकजा यांनी गृहमंत्री पदाबाबत मत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...