Friday 20 December 2019

गोंदिया जिल्ह्यात डिजीटल शाळांचा बट्ट्याबोळ



राबविली योजना नावापुरतीच
देवरी: २० - युती शासनाच्या काळात राज्यात मोठा गाजावाजा करून डिजीटल शाळा योजना राबविण्यात आली होती. मात्र, ही योजना आता फॉर्स ठरली असून केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच अनेक अधिकाऱ्यांनी ही योजना केवळ पारितोषिकासाठीच मोठी केली असल्याचे वास्तव आता समोर येत आहे. गोंदिया जिल्ह्यात तर डिजीटल झालेल्या जवळपास पूर्णच शाळेतील डिजीटल वर्ग आता धूळ खात पडले आहेत.
आजच्या  तंत्रज्ञानाच्या युगात खेड्यापाड्यात सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी शासनस्तरावरून अनेक योजना आणि उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून राज्यातील संपूर्ण शाळा या डिजीटल करण्याचे फर्मान तत्कालीन राज्य सरकारने सोडले होते. याच संधीचा फायदा उचलण्यासाठी काही हौसी अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील 100 टक्के शाळा डिजीटल झाल्याचे जाहिर करून टाकले होते. परिणामी, 2 मे 2017 रोजी  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भायंदर ठाणे येथे आयोजित डिजिटल शाळा पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून गोंदिया जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला होता. यासाठी गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचा महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल महामहिम सी.विद्यासागर राव, शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता
 डिजिटल इंडियाच्या संकल्पनेनुसार, प्रत्येक गाव आणि गावातील ग्रामपंचायत, शाळामध्ये तंत्रज्ञानाचे धडे देणे गरजेचे आहे. परंतु, डिजिटल शाळा झालेल्या गोंदिया जिल्हातील चित्र काही वेगळेच आहे. मोठा गाजावाजा करीत  १००%  डिजिटल शाळा करून आकडेवारीच्या खेळात निष्णात असलेला शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या नावावर फक्त श्रेय लाटण्यापुरतेच सक्रिय असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून  येत आहे.  देवरी तालुका हा नक्षलग्रस्त आणि आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु, शोकांतिका अशी आहे कि १००% डिजिटल झालेल्या शाळेमध्ये आजही पुरवठा सुद्धा खंडित आहे .
 परिणामी,ग्रामीण भागातील विद्यार्थी या डिजिटल संकल्पनेला पूर्णतः मुकला आहे. अनेक शाळेतील डिडीटल यंत्रणा सुद्धा धूळखात कचऱ्यात पडली असल्याचे सांगण्यात येते. जि.प. शाळेतील विद्यार्थी तर सोडा किती अध्यापक वर्ग माहिती तंत्रज्ञानात जागरूक झाला आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय बनला आहे. त्यात भरीसभर म्हणून अधिकाऱ्यांची या तालुक्याप्रती असलेल्या उदासिनतेने यात आणखी भर टाकली आहे.




No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...