Sunday 15 December 2019

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

नागपूर(विशेष प्रतिनिधी)दि.15- समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नावाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात उद्यापासून सुरू होत आहे. पुढील आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज नागपुरात आगमन झाले.उद्धव ठाकरे यांनी  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांना स्थगिती देण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथून प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र किती प्रकल्पांना स्थगिती दिली ते तर सांगा. मुंबईतील आरे मेट्रो कारशेड वगळता कुठल्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी हे सरकार पुढील 50 वर्षे टिकेल असा विश्वास बोलून दाखवला. राज्यतील सर्वसामाऩ्य जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला प्रशासनाच्या कामाचा अनुभव नसला तरी माझ्यात आत्मविश्वास आहे. राज्यतील सर्व जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती पार पाडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला ‘चहापान’ प्रथा आहे, ‘बहिष्कार चहापान’ ही नवी प्रथा होते आहे. चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातील नेत्यांनी तरी चहापानावर बहिष्कार घालायला नको होता. आपले पंतप्रधान चहावाले होते, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते, विशेष म्हणजे आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपला टोला लगावला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही आमची भूमिका स्पष्ट आहे.  सावरकरांच्या मुद्द्यावर अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण गोंधळ उडवा, तणावाखाली ठेवा, देशभरात परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…
  • शिवस्मारक घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करू.
  • सावरकरांचा मुद्दा उचलून लक्ष विचलीत केले जात आहे.
  • देशात अशांतता का पसरली आहे, त्याकडे आधी पाहा.
  • कोणत्याही विकास कामाना स्थगिती नाही.
  • शेतकऱ्यांना कर्जमुक्त तर करणारच, पण नेहमीसाठी चिंतामुक्तही करणार.
  • तिजोरीच्या चाव्या आता माझ्या हाती.
  • राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सत्यचित्र राज्यासमोर आणणार.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...